मुंबई : इस्त्रायल आणि हमास यांच्यात अद्याप युद्ध सुरुच आहे. यातच आता भारताकडून गाझातील नागरिकांसाठी दुसऱ्यांदा मदत पाठवण्यात आली आहे. यामध्ये खाद्यपदार्थ, औषधे आणि इतर महत्त्वाच्या एकुण ३२ टन वजनाच्या साहित्यांचा समावेश आहे.
१९ सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर विमान हे ३२ टन साहित्य घेऊन दिल्लीहून रवाना झाले आहे. हे साहित्य आधी इजिप्तला पोहोचेल. इजिप्तमधील एल अरिश शहरातील विमानतळावर हे साहित्य उतरवण्यात येईल.
हा परिसर गाझाजवळून केवळ ४५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर तिथून ते राफाह क्रॉसिंगद्वारे गाझामधील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. पॅलेस्टिनी नागरिकांना मदत करण्यासाठी इस्रायलने राफाह क्रॉसिंग उघडण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून इस्त्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्त्रायलनेही प्रत्युत्तर देत हल्ले सुरु केले आहे. हे युद्ध अद्याप सुरुच असून यात आतापर्यंत असंख्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात भारत सुरुवातीपासूनच दोघांनाही पाठींबा देत आहे.