भारतीय अर्थव्यवस्थेने भल्याभल्यांचे अंदाज चुकवत चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे. भारत २०२४-२५ या आर्थिक वर्षात ही कामगिरी करेल, असा अंदाज होता. मात्र, २०२३ मध्येच भारतीय अर्थव्यवस्थेने ही ऐतिहासिक नोंद केली. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’चा विश्वासदेखील भारताने सार्थ ठरवला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेने ऐतिहासिक कामगिरी केली असून, देशाचा जीडीपी चार ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेला आहे. भारताची अर्थव्यवस्था आता ३३३ लाख कोटी रुपयांची झाली असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारत ही कामगिरी करेल, असा अंदाज असतानाच २०२३ मध्ये हा टप्पा पार झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचे हे द्योतक. आर्थिक वाढीतील हा एक मैलाचा दगड असल्याचे मानले जाते. तरूण आणि वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण, देशात होत असलेल्या आर्थिक सुधारणा, रोजगार निर्मितीला मिळत असलेली चालना, डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर हे घटक या आर्थिक वाढीला कारणीभूत ठरले आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थेने चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केल्यामुळे, जागतिक स्तरावर एक प्रमुख आर्थिक शक्ती म्हणून भारताची ओळख प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे. तसेच परकीय गुंतवणुकीसाठी ते आता आकर्षक ठिकाण म्हणून ओळखले जाईल. ही गुंतवणूक आर्थिक विकासाला चालना देणारी असेल. देशाच्या अर्थव्यवस्थेत होत असलेली वाढ रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण करण्याबरोबरच जीवनमान उंचावते. तसेच देशातील गरिबी कमी करते. पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणारी ही वाढ कनेक्टिव्हिटी सुधारते. ’डिजिटल इकोनॉमी’त जागतिक नेतृत्व करण्याची भारताला संधी आहे. तसेच चीनला पर्याय म्हणून जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित होत आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी भारत नवकल्पना तसेच तंत्रज्ञानाला चालना देत, आपली वाढ सुनिश्चित करू शकतो. सेवा क्षेत्रात झालेली वाढ रोजगार निर्मितीला चालना देणारी ठरत आहे.
भारत हा व्यापार तसेच गुंतवणुकीसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून उदयास येत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे हे यश तिची आर्थिक लवचिकता तसेच वाढीच्या क्षमतेचा पुरावा म्हणून मानला जाईल. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीला मर्यादा आलेल्या असताना, भारताने केलेली कामगिरी ही म्हणूनच कौतुकास्पद ठरते. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताची प्रस्थापित होत असलेली ओळख भारताची विकासयात्रा सुरू ठेवणारी आहे.सकल देशांतर्गत उत्पादनाने चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला असून, भारत २०२४-२५ मध्ये हे लक्ष्य पूर्ण करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. तथापि, उल्लेखनीय लवचिकता तसेच पुनर्प्राप्ती दर्शवणारी भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. भारताने अलीकडच्या काही वर्षांत केलेल्या विविध संरचनात्मक सुधारणांच्या पार्श्वभूमीवर आर्थिक क्रियाकलापांचा वेग असाच मजबूत राहील, अशी अपेक्षा आहे. भारताने पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे जे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, ते साध्य करण्यास याची मदत होणार आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाईल, असा अंदाज आहे.
साथरोगाच्या कालावधीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने केलेली प्रगती जगाला चकित करणारी ठरली. चीनसारखा देशही मंदीचा सामना करत असताना, भारताची वाढ म्हणूनच लक्षणीय ठरते. जगाच्या तुलनेत भारताची वाढ ही सर्वाधिक असून, युरोपसह अमेरिकेच्या वाढीला मर्यादा आल्या आहेत.भारताचा जीडीपी २५ वर्षांत वाढत असला, तरी गेल्या काही वर्षांत त्याच्या वाढीला वेग आला. जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख आहे. भारताने फ्रान्स तसेच इंग्लंडला मागे टाकले आहे. त्याचवेळी गेल्या दशकात जीडीपीची वाढ ही जगातील सर्वाधिक आहे. सहा ते सात टक्क्यांनी ती नियमितपणे दर वर्षाला वाढत आहे. ’आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’च्या अंदाजानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ६.१ टक्के या दराने होत असून, ती २०२४-२५ या आर्थिक वर्षात पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडेल. तसेच त्यापुढील पाच वर्षांत ती चीनलाही मागे टाकेल. अमेरिका २६ हजार, ८५४ अब्ज डॉलरसह जगात पहिल्या क्रमांकावर असून, चीन १९ हजार, ३७४ अब्ज डॉलरसह दुसर्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जपान (४ हजार, ८७२), जर्मनी (४ हजार, ३०९), भारत (चार हजार) अशी क्रमवारी आहे. वाढीचा हा वेग असाच कायम राहिला, तर लवकरच भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. भारत आपली वाढ अधिक शाश्वत तसेच सर्वसमावेशक करण्यासाठी उपाययोजना करत असून, सामाजिक संरक्षण तसेच पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत आपली धोरणे समायोजित करत आहे.
जीडीपी दर
दरडोई सकल देशांतर्गत उत्पादन हे देशाच्या सामान्य आर्थिक समृद्धीचे मूल्यमापन करण्याचा मापदंड आहे. दरडोई जीडीपी हा आर्थिक कल्याण साध्य करण्याचा एक मार्ग आहे, जो देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि त्याची लोकसंख्या दोन्ही विचारात घेतो. एखाद्या देशाच्या लोकसंख्येने विभागलेले सकल देशांतर्गत उत्पादन हे त्या देशाच्या राहणीमानाच्या आणि आर्थिक समृद्धीच्या पातळीचे उपयुक्त मोजमाप असते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ या वर्षासाठी दरडोई अंदाजित वार्षिक उत्पन्न (निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न) हे १ लाख, ७२ हजार रुपये इतके आहे.अर्थमंत्रालय तसेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताच्या जीडीपीने चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केल्याबद्दल त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही; मात्र उद्योगपती गौतम अदानी, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे कौतुक केले आहे. हा जागतिक गौरवाचा क्षण असल्याची भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनवादी नेतृत्वाने भारताला अभूतपूर्व उंचीवर नेले आहे, अशीच सगळ्यांची भावना आहे. त्याचे प्रतिबिंब देशातील दिग्गजांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या या गौरवास्पद कामगिरीवर नोंदवलेल्या प्रतिक्रियेतून दिसून येते.
- संजीव ओक