मुंबई : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने अभ्यास गटाची स्थापना केली आहे. सोमवारी, २० नोव्हेंबरला यासंदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला असून, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.
आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ सप्टेंबर रोजी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासमवेत बैठक घेतली होती. मध्यप्रदेश, बिहार व तेलंगणा या राज्यांनी जातनिहाय यादीमध्ये समावेश असलेल्या जाती-जमातींना कोणत्या निकषांच्या आधारे जात प्रमाणपत्र व अन्य लाभ उपलब्ध करुन दिलेले आहेत, त्याचा अभ्यास करण्यासाठी त्या राज्यांत धनगर समाजाच्या प्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचा अभ्यासगट पाठवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले होते.
त्यानुसार, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहसचिव दे. आ. गावडे, महसूल विभागाचे संतोष गावडे, धनंजय सावळकर (अप्पर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक, महानिर्मिती, मुंबई), जगन्नाथ वीरकर (व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांचे विशेष कार्य अधिकारी), तसेच जे. पी. बघेळ, अॅड. एम. ए. पाचपोळ, माणीकराव दांडगे पाटील, जी. बी. नरवटे आदी अशासकीय सदस्यांचा या अभ्यासगटात समावेश आहे.