ठाणे : लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणातील, राज्य अथवा केंद्रातील त्रुटी दूर करुन लवकरच नामकरणाची प्रक्रिया पार पाडणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी सांगितले.
नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दा. बा.पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र शासनाने मंजुर केला आहे. पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी भेट घेऊन नामकरणातील प्रक्रिया त्वरित सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, नामकरणातील राज्य सरकारच्या त्रुटींची माहिती घेऊन ती त्वरित दूर करु. तसेच केंद्र सरकारच्या त्रुटी असतील तर त्या दूर करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल आणि नामकरण लवरात लवकर मार्गी लागावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल,असे मुख्यमंत्री शिंदे यांनी दशरथ पाटील यांना आश्वासित केले.
ना. कपिल पाटील केंद्रातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील !
लोकनेते दि.बा.पाटील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण ठरावातील त्रुटीसंदर्भात केंद्र सरकारच्या ५ ते ६ विविध विभागात तपासणी व अहवालासाठी फाईल जात असते. याबाबत माहिती घेऊन त्रुटींच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करु तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन विमानतळ नामकरण लवकरच मार्गी लावण्याची विनंती करण्यात येईल, असे मत समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्याशी बोलताना ना.कपिल पाटील यांनी व्यक्त केले.