मुंबई : २२ डिसेंबर २०१७ यादिवशी 'भद्रकाली' प्रॉडक्शन' च्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा शुभारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही 'संगीत देवबाभळी' ची नाट्य दिंडी विसावणार आहे.बुधवार, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.
हा सहा वर्षांचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर येणे तसे अवघड होते. परंतु भद्रकालीने हा प्रयोग केला आणि प्रेक्षकांच्या साथीने तो यशस्वही झाला. याच प्रेमामुळे या नाटकाने सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त केले आणि लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही 'देवबाभळी' आता ५०० व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रातला हा शेवटचा प्रयोग २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे सादर होणार आहे.