समुद्रातील शिकारी 'किलर व्हेल' अरबी समुद्रात: सिंधुदुर्ग आणि कर्नाटकमध्ये दर्शन

02 Nov 2023 16:01:46

killer whale sindhudurg

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किनाऱ्यालगत 'किलर व्हेल' ( killer whale ) या सागरी सस्तन प्राण्याचे दर्शन घडत आहे. महाराष्ट्रातील वेंगुर्ला ते कर्नाटकपर्यंतच्या सागरी परिक्षेत्रामध्ये 'किलर व्हेल'चा ( killer whal ) गट (पाॅड) फिरत असल्याचे निरीक्षण मच्छीमारांनी नोंदवले आहे. सागरी जैवसाखळीतील सर्वात मोठा डाॅल्फिन आणि शिकारी सस्तन प्राणी म्हणून हा जीव ओळखला जातो. ( killer whale )



समुद्री जैवसाखळीत महत्वाचे स्थान असणारा 'किलर व्हेल' हा सागरी सस्तन प्राणी त्याच्या काळ्या शरीरावर उमटलेल्या पांढऱ्या डागांमुळे सर्वपरिचित आहे. मात्र या प्राण्याचे दर्शन राज्याच्या सागरी परिक्षेत्रात तसे दुर्मिळ आहे. गेल्या काही दिवसांपासून या सागरी सस्तन प्राण्याचे दर्शन राज्याच्या किनारपट्टीलगत घडत आहे. २०१९ साली सर्वप्रथम पूर्णगड येथील मच्छीमारांना गावखडी गावाच्या किनारपट्टीनजीक 'किलर व्हेल'चे दर्शन घडले होते. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून वेंगुर्ला येथील निवती किनाऱ्यापासून दक्षिणेकडील कर्नाटकमधील मालपे किनारपट्टीच्या सागरी परिक्षेत्रामध्ये या जीवाचे दर्शन घडत आहे. साधारणपणे १० 'किलर व्हेल' या पाॅडमध्ये फिरत असल्याचे निरीक्षण मच्छीमारांनी नोंदवले आहे.




किलर व्हेल हा गटाने (पाॅड) शिकार करणार सागरी सस्तन प्राणी आहे. एका गटामध्ये साधारण ४० पर्यंत किलर व्हेल असतात. ५० ते ८० वर्षांपर्यत जगणाऱ्या या प्राण्याचा आकार २३ ते ३२ फुटांपर्यत असतो. त्याच्या पाठीवरील मोठा काळा पर ही या जीवाची ओळखखूण आहे. त्याचे वजन सहा टनांपर्यत असते. राज्याच्या सागरी परिक्षेत्रात खोल समुद्रात या सागरी सस्तन प्राण्याचा वावर असल्याची माहिती सागरी जीवशास्त्रज्ञ देतात. गोवा, देवबाग आणि वेंगुर्ला येथील खोल समुद्रात त्यांचे दर्शन घडते. मात्र किनारपट्टीनजीक हा जीव फारच कमी पाहण्यास मिळतो.

'किलर व्हेल'विषयी...

* मादी किलर व्हेल साधारण तीन ते दहा वर्षांच्या अंतराने पिल्लांना जन्म देते. त्यांच्या गर्भधारणेचा कालावधी १७ महिन्यांचा असतो.

* एका पिल्लाला जन्म देऊन मादी त्याचा दोन वर्षांपर्यंत सांभाळ करते. बहुतांश वेळा जन्मास आलेले पिल्लू त्याच गटामध्ये शेवटपर्यत राहतो.

* डाॅल्फिन प्रमाणे किलर व्हेल ही वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात.

* मासे, पेंग्विन, सील, समुद्री सिंह, व्हेल यांचावर हा जीव गुजराण करतो. त्यांची शिकार करताना वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब हा जीव करतो.

* एकाच परिक्षेत्रात राहणारे किलर व्हेल बऱ्याचदा मासेच खाणे पसंत करतात. मात्र स्थलातंर करणारे गट सागरी सस्तन प्राण्यांची शिकार करतात.


Powered By Sangraha 9.0