घोडबंदर रोडवर मध्यरात्री अवजड वाहतुक बंद

02 Nov 2023 18:17:19

heavy vehicles

ठाणे :
घोडबंदर येथील आनंदनगर ते कासारवडवली दरम्यान मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी गर्डर उभारले जात आहेत. यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गिकेवर २८ नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्री प्रवेशबंदी लागू केली आहे. येथील वाहने कापूरबावडी येथून भिवंडी मार्गे वसई विरार, गुजरातच्या दिशेने वाहतुक करू शकतील.त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदर, भिवंडी येथून हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे वसई, विरार आणि गुजरातमधील गोदामाच्या दिशेने वाहतुक करत असतात. ठाणे शहरात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच पर्यंत प्रवेश आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या वेळेत घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात अवजड वाहनांची वाहतुक होत असते.

घोडबंदर मार्गावर गेल्या काही वर्षांपासून मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गावर ‘यु’ आकाराचा गर्डर उभारण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केले आहे. या कामासाठी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर मध्यरात्री बंदीचा निर्णय वाहतुक पोलिसांनी घेतला आहे. या वाहतुक बदलामुळे मध्यरात्री अवजड वाहनांना बंदी असेल. हे वाहतुक बदल दररोज रात्री १२ ते पहाटे पाच यावेळेत २८ नोव्हेंबरपर्यंत दररोज लागू असतील.
 
 
Powered By Sangraha 9.0