चौकशीपासून पळ काढणे म्हणजे गुन्ह्याची कबुलीच

02 Nov 2023 18:58:11

sambit patra

नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीपासून पळ काढणे म्हणजे गुन्ह्याची कबुलीच आहे, असा घणाघात भाजपने केजरीवाल यांच्यावर केला आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले होते. मात्र, केजरीवाल यांनी हे समन्स म्हणजे सुडाचे राजकारण असल्याचा दावा करून चौकशीस जाणे टाळले. त्यावरून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी केजरीवाल यांना पत्रकारपरिषदेत जोरदार टोला लगाविला आहे.

भाजप प्रवक्ते डॉ. पात्रा म्हणाले, केजरीवाल ईडीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापासून आणि सत्याला सामोरे जाण्यापासून पळ काढत आहेत. ईडीसमोर हजर न होता त्यांनी मद्य घोटाळ्यातील आपला सहभाग मान्य केला आहे. जर त्यांनी भ्रष्टाचार केला नसेल तर त्यांना भीती का वाटते, याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्याचप्रमाणे केजरीवाल हे मद्य घोटाळ्याचे किंगपीन असून ते आता कायद्यापासून वाचू शकत नाही, असे डॉ. पात्रा यांनी म्हटले आहे. कायदेशीर कारवाईस केजरीवाल हे घाबरले असल्याचा दावा डॉ. पात्रा यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले, केजरीवाल यांचा तपास यंत्रणांवर, स्वत:च्या लोकांवर, निवडणूक यंत्रणेवर आणि कायद्यावर विश्वास नाही. सर्वोच्च न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी मनीष सिसोदिया यांच्याविरुद्धचा जामीन अर्ज फेटाळताना ज्या पद्धतीने टिप्पणी केली होती, त्यावरून हे स्पष्ट होते की अबकारी घोटाळ्यात ३३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. मद्य घोटाळा हा हजारो कोटी रुपयांचा असून त्यातील ३३८ कोटी रूपये हे हिमनगाचे टोक आहे.
 
पूर्वी केजरीवाल हे शीला दीक्षित, रॉबर्ट वाड्रा, लालूप्रसाद यादव, सोनिया गांधी यांनी भ्रष्टाचार केल्याचे दावे दररोज करत असत. मात्र, आज या लोकांसोबत त्यांनी आघाडी केली आहे. केजरीवाल हे कायद्यापेक्षा मोठे नसून लवकरच सत्य बाहेर येईल, असेही डॉ. पात्रा यांनी नमूद केले आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीस पत्र लिहून चौकशीस जाणे टाळले आहे. पत्रात केजरीवाल यांनी त्यांच्याविरोधात राजकीय षडयंत्र होत असल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे आता ईडी केजरीवाल यांना पुन्हा समन्स पाठवू शकते.

Powered By Sangraha 9.0