जयपूर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांना सुरुवात झाली असून येत्या २५ नोव्हेंबरला राजस्थानमध्ये निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, कांग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर ते केवळ हिंदूंबद्दल बोलत असल्याची टीका केली. यावर सरमा यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हिंदू आहे म्हणून हिदूंबद्दल बोलतो, यात गैर काय? असे त्यांनी म्हटले आहे.
हिमंता बिस्वा सरमा यांनी जयपूर येथे पत्रकारांशी संबाद साधला. ते म्हणाले की, “मी भारतात हिंदूंसाठी दोन शब्द बोलू नाही तर बाबर आणि औरंगजेबसाठी बोलेन का? भारतात हिंदूंचे हित म्हणजे काय? हिंदू म्हणतो की, संपूर्ण जग हे त्याचे कुटुंब आहे. जर आपण अशा संस्कृतीचा गौरव करणार नाही, तर कुणाचा करणार? असे ते म्हणाले आहेत. तसेच "तुम्ही प्रियंका गांधींना सांगा की, जोपर्यंत आमचा श्वास असेल तोपर्यंत आम्ही हिंदूंचे गुणगान करु," असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रियंका गांधी यांनी राजस्थानमध्ये भाजपवर निवडणुकीदरम्यान धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आरोप केला होता. तसेच भाजप नेहमीच धर्म, मंदिर आणि मशिदीच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडून मतांचे राजकारण करते, असेही त्या म्हणाल्या होत्या. यावर आता हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.