समाजसेवेसाठी संवेदना महत्वाची : सुहासराव हिरेमठ

जयंत नातू आणि अश्वमेध परिवाराकडून भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेस (मोतीबाग) एक कोटींचा निधी

    19-Nov-2023
Total Views |

Jayant Natu


पुणे :
"निःस्वार्थ समाज सेवेसाठी संवेदना महत्वाची आहे. ही संवेदना कधीही क्षीण होता कामा नये. कारण संवेदनेतूनच समाजासाठी काम करण्याची प्रेरणा, उभारी मिळते," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांनी केले.
 
भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेला (मोतीबाग) ज्येष्ठ उद्योजक जयंत नातू आणि अश्वमेध परिवाराच्या वतीने एक कोटी रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला. त्यावेळी हिरेमठ बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकर्ते प्रा. अनिरुद्ध देशपांडे, भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी, पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, उद्योजक जयंत नातू आदी उपस्थित होते.
 
सुहासराव हिरेमठ म्हणाले की, "आजच्या काळात सर्व काही मिळेल; पण दानशूर आणि समाजासाठी काही करण्याची प्रेरणा असणाऱ्या दात्यांची कमी आहे. आजच्या या कार्यक्रमातून समाजालाही प्रेरणा मिळणार आहे. प्रत्येकाने समाजासाठी, सेवा प्रकल्पांसाठी संकल्प करायला हवा. दरवर्षी विशिष्ट रक्कम, वेळ सेवा प्रकल्पांसाठी द्यावी. घरातील मंगल प्रसंगी सेवा प्रकल्पांसाठी मदतीचा हात द्यावा."
 
प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले की, "भारतीय संस्कृतीमधील दातृत्व हा महत्वाचा गुण जपण्याबरोबरच विकसित करण्याचा प्रयत्न करायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समाज हे स्वतंत्र नाहीत, तर एकरुप आहेत. समर्पण भावनेने काम करण्याची गरज आहे. आजचा कार्यक्रम समर्पणाचे दर्शन घडवत आहे," असे ते म्हणाले.
 
यावेळी जयंत नातू यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, राष्ट्रीय भावनेने काम करणारे कार्यकर्ते संघाच्या माध्यमातून तयार झाले आहेत. देशासाठी अनेक प्रचारक घडविले आहेत. समाज आणि संघाने आयुष्यात जे दिले त्याची परतफेड करता येत नाही; पण कर्तव्य भावनेतून हा निधी प्रदान करत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी राजीव जोशी यांनी संघ कार्याची आणि मोतीबाग संस्थेच्या नवीन बांधकाम प्रकल्पाची माहिती सांगितली. अशोक वझे यांनी स्वागत केले. ऍड. पद्मा गोखले यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.