सलग नऊ विजयांनंतर ‘विश्वचषका’च्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजयाने भारतीय क्रिकेट संघाला हुलकावणी दिली असली, तरी संघाची आजवरची ‘विश्वचषका’तील सातत्यपूर्ण कामगिरी ही सर्वस्वी कौतुकास्पदच. तेव्हा त्याचे श्रेय संपूर्ण संघाचे असले, तरी संघाचा कर्णधार म्हणून ‘हिटमॅन’ रोहित शर्माचे नेतृत्व अव्वल ठरावे. त्यानिमित्ताने कुशल कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेणारा हा लेख...
क्रिकेट सामन्यांत स्थित्यंतरं होत गेली. कसोटी सामने, ५० षटकांचे, २० षटकांचे असे क्रिकेट सामने रंगतदार होऊ लागले. त्यातील एकदिवसीय सामन्यांच्या ’विश्वचषका’च्या स्पर्धेतही भारताने चित्तवेधक कामगिरी करत, जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच सादर केली.
क्रिकेट म्हटले की, पिढी दर पिढी क्रिकेटप्रेमींना सी. के. नायडू, इफ्तेखार अलिखान पतौडी, लाला अमरनाथ, विजय हजारे, विनू मंकड, गुलाम अहमद, पॉली उम्रीगर, हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, पंकज रॉय, गुलाबराय रामचंद्र, नरी कॉन्ट्रॅक्टर, मन्सूर अली खान पतौडी, चंदू बोर्डे, अजित वाडेकर, वेंकटराघवन, सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी, गुंडाप्पा विश्वनाथ, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, श्रीकांत, अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, गांगुली, राहुल द्रविड, सेहवाग, अनिल कुंबळे, धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे अशी १९३२ ते आजपावेतो कमीत कमी एका कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे, अशांची नोंद सापडेल.
तसेच आता आपण कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे, अशा कर्णधारांची यादी पुढीलप्रमाणे आहे ती पाहू ः अजित वाडेकर, वेंकटराघवन, बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्वनाथ, कपिल देव, सय्यद किरमाणी, मोहिंदर अमरनाथ, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, श्रीकांत, अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, अजय जडेजा, गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, धोनी, सुरेश रैना, गौतम गंभीर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि विद्यमान रोहित शर्मा.
कसोटी, एकदिवसीय सामन्यानंतर सुरू झाले, २० षटकांचे झटपट सामने. जे आता ’आशियाई’ क्रीडाप्रकारात आले आहेत, तर ’ऑलिम्पिक’च्या उंबरठ्यावर आहेत. अशांत कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे, अशा कर्णधारांची यादी अशी आहे. वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली.
या नामावलीत आठवतात, ते त्या-त्या वेळीचे संघनायक आणि त्यांच्या समवेत भारताने केलेली कामगिरी. सध्या आपण सगळेच एकदिवसीय सामन्यांत गुंतलेले आहोत. अशा एकदिवसीय सामन्यांचा विचार करता, आपल्याला ही पुढची नावं डोळ्यासमोर येतील. साखळी फेरीत सर्वाधिक धावा करणारे जे पाच फलंदाज या स्पर्धेत गाजले, त्यात विराट कोहली (भारत) ५९४ धावा, क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका) ५९१ धावा, रचिन रवींद्र (न्यूझीलंड) ५६५ धावा, डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) ४९९ धावा अशा या नामावलीत चौथ्या क्रमांकावर असलेला आणि ५०३ धावा जमवणारा कर्णधार रोहित शर्माचा आपण विशेष उल्लेख करायलाच हवा. कारण, रोहित शर्माच्या रुपात भारताला एक उत्कृष्ट कर्णधार मिळाला आहे.
आजी-माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक, क्रीडा समालोचक, क्रीडा वार्ताहर, क्रिकेट सामन्यांचे घरी बघणारे/क्रीडांगणावरचे प्रेक्षक, क्रीडा मासिक, साप्ताहिक असे सगळे आज ज्या कर्णधाराच्या नेतृत्व गुणांची स्तुती करत आहेत, ते नाव म्हणजे रोहित शर्मा. क्रिकेटमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरलेला रोहित गुरुनाथ शर्मा. जगाकडून ’हिटमॅन’ नावाची पदवी मिळवलेला रोहित शर्मा हा आपला कर्णधार उजव्या हाताचा फलंदाज असून, अधूनमधून तो उजव्या हाताने ‘ऑफ ब्रेक’ गोलंदाजीही करतो. दि. ३० एप्रिल १९८७ला नागपूरमध्ये जन्मलेल्या रोहित शर्माने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत सलग दोन शतके केली. त्यातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या नोव्हेंबर २०१२ मधील ईडन गार्डन, कोलकाता येथे झालेल्या कसोटीत १९९ धावा करून त्याचे पहिले व वेस्ट इंडिज विरुद्धच्या वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या दुसर्या कसोटीत नाबाद १११ धावा करून दुसरे शतक पूर्ण केले. दि. २ नोव्हेंबर २०१३ रोजी बंगळुरू येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने २०९ धावा करून आपले पहिले द्विशतक पूर्ण केले.
याच सामन्यात त्याने १६ षटकार मारले व एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्यानंतर दि. १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये ईडन गार्डन्स, कोलकाता येथे एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी २६४ धावा करून, त्याने जगात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एक सलामीचा फलंदाज म्हणून भारताकडून सर्वात जलद चार हजार धावा पूर्ण केल्या.रोहितने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके केली आहेत आणि ‘टी-२०’ मध्ये चार शतके केली आहेत. त्याने २०१७ डिसेंबरमध्ये श्रीलंके विरुद्ध टी-२० मध्ये ३७ चेंडूंमध्ये जलद शतक ठोकणारा, तो जगात दुसरा क्रिकेट खेळाडू ठरला. रोहित हा एकदिवसीय सामन्यामध्ये तीन द्विशतक करणारा जगातील अव्वल खेळाडू आज भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
कुशल कर्णधार हा आपल्या सहकार्यांना संघातील स्थानाबाबत हमी देत असतो. त्याच्या पाठबळावर आपल्या खेळाडूंचे ’ड्रेसिंग रूम’मधील वातावरण मनमोकळे व खेळीमेळीचे राहू शकते. ’आयपीएल’, ’चॅम्पियन लीग’ असो किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमधील ऐतिहासिक यशस्वी नेतृत्व असो, रोहित शर्मासारखा कर्णधार त्या सगळ्यात गुणी ठरत आला आहे. रोहित शर्माच्या बाबतीत विदेशी कर्णधारदेखील प्रतिपादन करताना म्हणतो की, ”रोहित शर्मा ’विश्वचषका’च्या यावेळीच्या फलंदाजीत सलामीला येऊन पहिल्या षटकापासूनच आक्रमक राहिला होता. अंदाजे महिन्याहून कमी अधिक काळ लोटल्यावर खेळपट्टी संथ होत जाते. ’पॉवरप्ले’च्या काळात जास्तीत जास्त धावा गरजेच्या ठरत असतात. या उद्देशाने रोहित शर्मा फटकेबाजी करण्याचे जाणीवपूर्वक ठरवत खेळतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांची मानसिकता डळमळीत होत जाते. नाणेफेकीत भारतावर प्रथम फलंदाजीची पाळी येताच, प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात रोहित शर्माच्या फलंदाजीबाबत भीती निर्माण होत असते.”
भारतीय संघाने रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली ऩऊही साखळी सामन्यांत पैकीच्या पैकी सामने जिंकत आणि उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून दहा सामने सलग जिंकवून दाखवण्याची देदीप्यमान कामगिरी या कर्णधाराने दाखवली आहे. सगळे त्याचे कोडकौतुक करत असताना, रोहित शर्मा जाणून असतो आणि सवंगड्यांना जाणीवही करून देत असतो की, एखाद्या लढतीत आपल्याला पराभवाचा सामना करावा लागल्यास, मेहनत वाया जातेच जाते आणि सगळे आपल्या सगळ्या संघावर टीका करताना कर्णधारावरदेखील टीकास्त्र सोडतात, याची त्याला जाणीव असल्याने त्यांनी ती वेळ या वेळेस येऊच नये, हे पाहिले. ’विश्वचषक’ स्पर्धेत गत स्पर्धेत उपांत्य फेरीत ज्या न्यूझीलंडकडून हार पत्करायला लागली होती, कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पराभूत झाला होता, त्याच भारताने रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली न्यूझीलंडला वानखेडेच्या मैदानावर दाखवून दिले आहे.
भारताला अंतिम सामन्यात घेऊन जाणारा हा कर्णधार एका तेलुगू-मराठी कुटुंबातून वाढलेला महाराष्ट्रीयन आहे. याचा महाराष्ट्रातील समस्त क्रिकेटप्रेमींना नक्कीच सार्थ अभिमान आहे. त्याचे वडील गुरुनाथ शर्मा हे एका ट्रान्सपोर्ट फर्म स्टोअर हाऊसचे केअरटेकर म्हणून काम करत होते. वडिलांचे उत्पन्न कमी असल्याने शर्माचे बोरिवलीतील आजी-आजोबा आणि काकांनी संगोपन केले. डोंबिवलीत एका खोलीच्या घरात राहणार्या त्याच्या पालकांना तो फक्त आठवड्यात एकदा भेटायला जायचा. आज त्याचे जीवन क्रिकेटमुळे बदललेले असून, तो अन्य क्रिकेटवीरांसारखा श्रीमंत झाला आहे. एवढे असूनही समाजाला आपले देणे लागते म्हणून ‘पेटा’सारख्या प्राण्यांसाठी कार्य करणार्या संघटनेत कार्य करत असतो. रोहित शर्माला देशाचे दोन मोठे सन्मान ’अर्जुन पुरस्कार’ आणि ’खेलरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. हे आणि असे कार्य करत आपली क्रिकेटची कारकिर्द उज्ज्वल करत असून, तो भारताचेही नाव क्रीडाक्षेत्रात उज्ज्वल करत आहे.
विराट कोहली ते मोहम्मद शमी तर प्रशिक्षकांसून सपोर्ट स्टाफपर्यंत सगळ्यात लाडका झालेला रोहित शर्मासारखा कर्णधार. या एकदिवसीय ’विश्वचषक’ स्पर्धेत भारताच्या कर्णधाराने पैकीच्या पैकी सामने जिंकून दाखवले आहेत. त्याच्यावर कोणीही टीकेची झोड उठवली नाही. रोहित शर्माने आपल्या देहबोलीतून आपली वर्तणूक सिद्ध केली आहे. संघातील सहकार्यांना त्याने सदा प्रोत्साहित केले आहे. कर्णधारपदाला आवश्यक असलेला अनुभवही रोहित शर्माने संपादित केला आहे. संघातील नवोदित व वरिष्ठ खेळाडूंमध्ये जो समतोल असावा लागतो, तो रोहित शर्माकडे दिसून आला आहे. एकूणच भारतीय संघ आज ज्यापद्धतीने खेळत आला आहे, त्या संघात आणि संघनायकात असलेली एकी व परस्पर संवाद, सामंजस्य हे भारताच्या विजयात मोलाचे योगदान देऊन गेलं आहे. रोहित शर्माकडे असलेली आक्रमकता भारताच्या वर्चस्वातील सर्वात मोठी बाब ठरली आहे. या उलट ऑस्ट्रेलियन संघाला जेव्हा सलग दोन पराभव स्वीकारावे लागले होते, तेव्हा माध्यमांनी त्यांच्या कर्णधारावर टीकेची झोड उठवली होती. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाच्या आजवरच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात दुबळा कर्णधार असा उल्लेख करत, त्याची खिल्ली उडवली होती. असे असले तरी आज ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला आव्हान दिले असले तरी रोहित शर्माचा संघ खचितच अव्वल ठरत आला आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावर असलेल्या क्रीडा संकुलातील पंतप्रधानांच्या नावावर असलेलं, विश्वातील सर्वात मोठ्या क्रीडांगणातील एक असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या, ’विश्वचषक’ स्पर्धेत दि. १९ नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्मा समाजमाध्यमांतून आपले विचार व्यक्त करत होता. १४२ कोटी भारतीयांना आश्वासित करताना, त्याने सांगितलं होत की, ”भूतकाळाचा विचार करणे, मला आवडत नाही. मी केवळ वास्तवाचा विचार करतो. या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. अन्य कसलाही आम्ही विचार करणार नाही. दोन्ही संघ दर्जेदार कामगिरी करून अंतिम फेरीत पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ परिपूर्ण आहे. मात्र, आम्ही केवळ आमची कामगिरी आणि योजनांवर लक्ष केंद्रित करू,” असे आत्मविश्वासपूर्वक सांगत, भारतीय संघाने रविवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी आपले सर्वस्व पणाला लावले. त्याचे फळ मात्र भारताला मिळाले नाही. भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची पराकाष्ठा केली.
कर्णधाराला फक्त उपकर्णधार के. एल. राहुलचीच नव्हे तर फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक तसेच प्रशिक्षक, संघ निवड समिती, फिजिओ, डॉक्टर, आहारतज्ज्ञ अशा अनेकजणांची साथ लाभली होती. ते आपले आपले कार्य पार पाडत, एकजूट दाखवत होते. परंतु, नियतीला ते मान्य नव्हते. आपण एवढेच म्हणू शकतो.
कर्णधाराला एकजुटीची साथ मिळाली की, संघ विजयी ठरतो, हे आपल्याला क्रिकेटमधून समजले. तद्वतच आपल्या राष्ट्राला विजयी करायचे असेल, तर राष्ट्राच्या कर्णधाराला आपण साथ द्यायला हवी. आपण जरी फक्त क्रीडाप्रेमी प्रेक्षक असलो तरी आपण क्रिकेटबरोबर आलेले विचार लक्षात ठेवले पाहिजेत, अशा वेळेस नरेंद्र मोदींचे गुरू अटलजींचे ते शब्द आठवतात-
क्या हार में क्या जीत में
किंचित नहीं भयभीत मैं
संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही
वरदान माँगूँगा नहीं...
श्रीपाद पेंडसे
९४२२०३१७०४