अमृतकाळ आणि विकसित भारतासाठी तरुणाईचा नवसंकल्प

    19-Nov-2023
Total Views |
Article on India Government Policies for New Bharat

अमृतकाळातील विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार होईल, ही आशा व विश्वास दृढ करण्याची आज नितांत गरज आहे. त्यासाठी मुख्य प्रवाहातील माध्यमांसह सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तरुणांचे बौद्धिक प्रबोधन व्हायला हवे, ते देशभक्ती आणि राष्ट्रवादी चेतनेच्या संवादातूनच शक्य आहे. त्यासाठीचा हा लेखप्रपंच...

अमृतकाळाचे नवीन संदर्भ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत सरकारने दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याची ७५ वर्षे ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरी केली. ‘आझादी का अमृत काल’ दि. १५ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०४७ पर्यंत आहे. या २५ वर्षांच्या कालावधीत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पंतप्रधानांनी दि. १२ मार्च २०२१ रोजी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या उद्घाटनावेळी आपल्या भाषणात सामायिक केले होते. ही तारीख महत्त्वाची आहे. कारण, या दिवशी महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्ध मिठाचा सत्याग्रह सुरू केला होता. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यामागचे कारण म्हणजे, इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताची मुक्तता होय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून स्वतंत्र भारतातील जनतेला स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा खरा अर्थ कळणे महत्त्वाचे आहे. गेल्या ७५ वर्षांत भारत प्रगतीच्या वाटेवर किती पोहोचला आहे, याची आठवण करून देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

भारताची अफाट युवाशक्ती

भारताकडे काय आहे, असा प्रश्न जर कोणी विचारला तर आपण म्हणू की, भारतामध्ये प्रचंड प्रतिभा, शक्यता आणि तरुणांच्या संधी आणि समृद्ध ज्ञान परंपरेचे सामर्थ्य आहे. ही शक्ती म्हणजे भारतातील प्रचंड आणि सक्षम तरुणाई. जगातील सर्वात मोठी तरूण लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत या यादीत अव्वल आहे. भारतातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे वय २५ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे वय हे ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. हे तरुण मनुष्यबळ म्हणूनच देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक मोलाची संपत्ती ठरावे.

तसेच दुसरीकडे भारताची विस्तारणारी अर्थव्यवस्था तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करत आहे. देशातील बेरोजगारीचा दर सहा वर्षांतील निच्चांकी पातळीवर आहे. विकासाचे फायदे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत समान प्रमाणात पोहोचलेले दिसतात. त्यामुळे गाव आणि शहर या दोन्ही ठिकाणी संधी वाढत आहेत. महिला कर्मचार्‍यांच्या सहभागातही लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील प्रत्येक तरुणाने आपले आंतरिक ज्ञान, गुण आणि ऊर्जा देशाच्या आणि समाजहितासाठी प्रसारित केली पाहिजे. म्हणूनच यानिमित्ताने आम्ही युवाशक्तीला आवाहन करतो की, ‘आत्मनिर्भर भारता’च्या भावनेने प्रेरित असलेले पंतप्रधान मोदींचे ’भारत २.०’ सक्रिय करण्याचे ’व्हिजन’ साकार करण्याची शक्ती आणि क्षमता आजच्या युवापिढीकडेच आहे. तसे झाले तर नव्या भारताची सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक ओळख विकसित होईल, हे निश्चित.

आज भारत एक आण्विक शक्ती असण्यासोबतच एक मोठी लष्करी शक्तीदेखील आहे. एवढेच नाही तर चंद्र आणि मंगळ ग्रहावर मानवीय मोहिमा पाठवणार्‍या देशांच्या यादीत भारताचे नावही समाविष्ट झाले आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. क्रीडा स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूंनी जगात अव्वल स्थान पटकावले आहे. अलीकडेच हँगझोऊ २०२३ मध्ये झालेल्या ’आशियाई क्रीडा स्पर्धे’त भारताने २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य अशी एकूण १०७ पदके जिंकली. भारतीय खेळाडू ‘ऑलिम्पिक’मध्ये देशाचा गौरव करत आहेत. ’ऑलिम्पिक’मधील १०० पदके आणि क्रिकेट ’विश्वचषका’तील विजयांची मालिका ही सुचिन्हेच म्हणावी लागतील.

पुनर्जागरणाची गरज
 
आजच्या युवाशक्तीला संतुलित आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. संस्कृती आणि सभ्यतेसोबतच देशाप्रति असलेली देशप्रेमाची भावना ही अत्यंत महत्त्वाची. प्रत्येक तरुणाच्या मनातील रामराज्याची भावना हाच नव्या भारताचा आधार आहे. आजच्या तरूण पिढीला स्वातंत्र्याचा लढा आणि लोकशाहीचे महत्त्व तितकेसे माहीत नाही. अनेक वैचारिक प्रवाहात विभागलेली ही पिढी म्हणूनच काहीशी भरकटलेली आहे. उद्या ज्यांच्या खांद्यावर देशाची जबाबदारी असेल, त्यांना भारताला स्वतंत्र करण्यासाठी कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले आणि देशाला कोणते बलिदान द्यावे लागले, हे सांगणे देखील तितकेच महत्त्वाचे. तरुणांना पुढील आव्हानांची जाणीव करून देणे, ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी. अर्थात, शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवल्या जाणार्‍या देशाच्या इतिहासातून त्यांना स्वातंत्र्याची थोडीफार माहिती मिळते. पण, त्यांना स्वातंत्र्यलढ्याची कथा जवळून माहीत नाही. इतिहासाच्या अनेक गोष्टी अभ्यासक्रमात नाहीत, ज्या जाणून घेणे आणि सांगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण पथदर्शक ठरणार आहे.

उभरती महाशक्ती

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा उदयोन्मुख महासत्ता मानला जातो. स्वातंत्र्याच्या या सुवर्णकाळात भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली असून, लवकरच ती तिसर्‍या क्रमांकावर पोहोचेल. भारताने ग्रेट ब्रिटनला अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मागे टाकले आहेच. आता अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हे चार देश आहेत, ज्यांची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे. ’आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार २०२१-२२ मध्ये ३.२३.२ ट्रिलियन वरून २०२६-२७ मध्ये पाच ट्रिलियनच्या पुढे जाईल. चाणक्य (कौटिल्य) यांच्या अर्थशास्त्रापासून प्रेरणा घेऊन, भारताने नवीन जागतिक अर्थव्यवस्थेत आपले मूलभूत आणि कायमस्वरुपी स्थान निर्माण केले आहे. विकसित भारताच्या स्वप्नाकडे आपली वेगवान वाटचाल सुरु झाली आहे. चाणक्य आणि विवेकानंदांच्या धोरणांनी प्रेरित होऊन आपल्या देशातील तरुणांचे ध्येय महान गोष्टी साध्य करणे, हे असले पाहिजे. अर्थात, भारत तेव्हाच पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, जेव्हा देशातील तरूण मनाने आणि कृतीने देशाशी जोडले जातील.

राष्ट्रीय युवा सक्षमीकरण कार्यक्रम

सध्याचे सरकार नवीन शैक्षणिक धोरण आणि अधिकाधिक वैद्यकीय महाविद्यालये, ’आयआयटी,’ ’आयआयएम’ आणि इतर संस्था उघडण्याचा आणि ’पीएम कौशल्य विकास योजने’द्वारे कोट्यवधी तरुणांना प्रशिक्षित करण्याचा कार्यक्रम राबवित आहे. पारंपरिक क्षेत्रांना पाठिंबा देण्यासाठीदेखील मोदी सरकार वचनबद्ध आहे. तरुणांसाठी ‘डिजिटल इंडिया’ आणि ’स्टार्ट अप इंडिया’सारख्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणार्‍या कित्येक योजना सरकारने आखल्या आहेत. ’राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम’ (RYSK) खालील सात उपयोजनांद्वारे राबविण्यात येतात ः नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS), नॅशनल यूथ कॉर्प्स (NYC), राष्ट्रीय युवा आणि किशोर विकास कार्यक्रम (NPYAD), आंतरराष्ट्रीय सहकार्य, युवा वसतिगृहे (YH), स्काऊटिंग आणि मार्गदर्शक संस्थांना साहाय्य, राष्ट्रीय युवा नेतृत्व कार्यक्रम (NYLP) ’RYSK’च्या (NYKS) उपयोजनेअंतर्गत, सध्या सुमारे ५०.३४ लाख युवा स्वयंसेवक २.५७ लाख युवा मंडळांद्वारे नोंदणीकृत आहेत आणि देशभरातील ६२३ जिल्ह्यांचा समावेश आहे. (RYSK) योजनेचे उद्दिष्ट राष्ट्रीय एकात्मता, साहस, युवा नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्वाला प्रोत्साहन देणे आहे. विकास, किशोरवयीन विकास आणि सक्षमीकरण, तंत्रज्ञान आणि संसाधन विकासाला याअंतर्गत प्रोत्साहन दिले जाते.

’माय यंग इंडिया’ व्यासपीठ

’राष्ट्रीय एकता दिना’निमित्त कर्तव्याच्या वाटेवर असलेल्या देशातील तरुणांसाठी ’मेरा युवा भारत’ (माय इंडिया) व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आला. दि. ११ ऑक्टोबर रोजी महत्त्वाचा निर्णय घेत, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ’मेरा युवा भारत’ (माय इंडिया) नावाच्या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला मान्यता दिली. ’मेरा युवा भारत’ (माय इंडिया)ची कल्पना युवकांच्या विकासासाठी आणि तरुणांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी तंत्रज्ञानावर आधारित एक महत्त्वपूर्ण सक्षमकर्ता म्हणून करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि लोकांना सक्षम करण्यासाठी समान संधी प्रदान करण्यासाठी सरकारच्या स्पेक्ट्रममध्ये सक्षम बनवणे आहे. त्यामुळे विकसित भारत निर्माण करण्यासाठी हातभार लागणार आहे.

युवक आपल्या कर्तृत्वाने प्रगती आणि यशाची पताका सतत फडकवत, देशाच्या विकासात हातभार लावत असतात. भारत आज एक मोठी अर्थव्यवस्था असलेला आणि प्रत्येक क्षेत्रात विकास करणारा देश म्हणून नावारुपाला आला आहे. ’सबका साथ, सबका विकास’ या घोषणेसह भारत सरकार आपल्या योजनांद्वारे सर्व स्तरातील नागरिकांना विविध सेवा प्रदान करते आहे, ज्यामुळे सध्याचे भारताचे चित्र बदलले आहे. आज जग भारताकडे आदराने पाहत आहे. आता हा ‘अमृतकाळ’ प्रत्येक तरूण भारतीयासाठी महत्त्वाचा आहे. आपला देश ‘तरूण भारत’ आहे. या देशात युवा विचार अवतरणे आणि आपली धोरणे पुढे नेणे, हे आपल्या देशातील युवाशक्तीचे काम आहे. पुरोगामी भारत हा पाच ट्रिलियन शक्यतांचा भारत तेव्हाच होईल, जेव्हा देशातील तरूण आपल्या कर्माने आणि मनाने देशाशी जोडले जातील, आपल्या देशाच्या खांद्याला खांदा लावून चालतील, तेव्हाच खरी दिवाळी होईल.

भारत ही जन्मभूमी, मातृभूमी, स्वर्ग, देवाची भूमी आहे. तो दिवस सुवर्ण दिवाळीचा असेल, जेव्हा भारतातील प्रत्येक तरूण सक्षम, कुशल आणि जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक क्षमतेने सुसज्ज असेल. हा प्रवास लांबचा आणि आव्हानांनी भरलेला आहे. पण, आमचा संकल्प हिमालयाच्या शिखरासारखा उत्तुंग आहे.

विराट सिंह
(लेखक भाजप युवा मोर्चा, मुंबईचे सचिव आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.