इंद्रायणी साहित्य संमेलनास सुरुवात

    18-Nov-2023
Total Views |

moshi 
 
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजा दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली आज व उद्या द्विदिवशीय इंद्रायणी साहित्य संमेलनाचे आयोज मोशी येथे करण्यात आले आहे. यावेळी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, मुलाखत, पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, कवी संमेलन, व्याख्यान, परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
शनिवारी सायंकाळी चार वाजता श्री नागेश्वर मंदिर ते पद्मश्री ना. धों. महानोर साहित्यनगरी या दरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. ग्रंथदिंडीचे पूजन जेजुरीच्या मार्तंड देवस्थानचे विश्वस्त पांडुरंग थोरवे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
 
सायंकाळी साडेपाच वाजता ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे यांना प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर ॲड. पांडुरंग थोरवे यांना विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील वृत्तपत्रीय लेख, अग्रलेखांचे प्रदर्शनाचे उदघाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे. रात्री साडे आठ ते दहा या दरम्यान कवी राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.
 
रविवारी सकाळी साडे नऊ ते अकरा या वेळेत युवा प्रबोधनकार व विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे यांचे ‘संतत्व आणि साहित्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास जैद हे अध्यक्षस्थान भूषविणार आहे. सकाळी अकरा ते एक या वेळेत ‘स्त्रियांचे साहित्यातील योगदान’ या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता बर्वे, इंदुमती जोंधळे, डॉ. अपर्णा महाजन, डॉ. लता पाडेकर सहभागी होणार आहे. डॉ. सीमा काळभोर समन्वय करणार आहेत.
 
यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून दुपारी सव्वा तीन वाजता ‘शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व’ या विषयावरील चर्चासत्रात श्रीमंत रघुजीराजे आंग्रे (इतिहास अभ्यासक व सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज), इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे दिग्विजय जेधे (इतिहास अभ्यासक व कान्होजीराजे जेधे यांचे वंशज) हे सहभागी होणार आहेत.
 
रविवारी सायंकाळी पाच वाजता विविध क्षेत्रातील कर्तबगार दहा व्यक्तींना राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते ‘भूमिपुत्र पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. माजी आमदार विलास लांडे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर समारोप सत्रात विचारवंत आणि संपादक संजय आवटे यांचे प्रमुख भाषण होणार आहे. शिवचरित्र अभ्यासक अनिल पवार, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, माजी सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर मोळक हे उपस्थित राहणार आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.