‘कोरोना’नंतर सामान्य माणसांच्या मनोरंजनाच्या व्याख्या बदलून गेल्या. ‘ओटीटी’ने घरबसल्या प्रेक्षकांना विविध भाषांच्या आशयाची मेजवानी एकाच ताटात वाढून दिली. परिणामी, मराठी भाषेचा प्रेक्षकवर्गही विभागला गेला. पण, एकीकडे मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत, ही ओरड सुरू असताना इतर भाषिक चित्रपटांमुळे बर्याचदा मराठी प्रेक्षकांना प्रदर्शनाच्या तारखांमध्ये माघार घ्यावी लागल्याचेही दिसते. ‘द केरला स्टोरी’, ‘जवान’, ‘टायगर ३’ अशा मोठ्या हिंदी चित्रपटांचा फटका मराठी चित्रपटांना यापूर्वीदेखील बसला आहे. तेव्हा, अशाच काही प्रदर्शनाच्या तारखा बदलाव्या लागलेल्या मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला. त्यांचे या ‘तारीख पे तारीख’विषयी नेमके म्हणणे काय, ते जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
प्रेक्षकवर्ग, स्थळ यांचा चित्रपट प्रदर्शनापूर्वी अभ्यास आवश्यक
चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा बदलण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे शासनाकडून जो नियम लागू करण्यात आला आहे की, मराठी चित्रपटांना एक स्क्रिन देणे अनिवार्य आहे. हा नियम सोयीनुसार पाळला जातो किंवा जात नाही. दुसरी बाब म्हणजे, प्रेक्षकांचा प्रतिसाद, त्यांच्या आवडीसोबत आर्थिकदृष्ट्यादेखील फार महत्त्वाचा असतो. हिंदी चित्रपटांच्या वितरणासाठी उपलब्ध असणारा निर्मिती खर्च आणि मराठी चित्रपटांकडे उपलब्ध असणारा खर्च यात फार तफावत आहे. याचं कारण असं की, ’बॉक्स ऑफिस’वर तो चित्रपट किती कमाई करतो आणि दुसरे म्हणजे, मराठी प्रेक्षकांचा आवाका फार लहान आहे. त्यातही त्यांना इतर भाषिक आशयाचा आस्वाद घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपला चित्रपट चालण्यासाठी त्या तारखांना इतर कोणते मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत की नाही, याचा अभ्यास करून मगच तारीख निश्चित करावी लागते. याव्यतिरिक्त दिग्दर्शक, निर्माते यांनी आपला चित्रपट महाराष्ट्रात नेमका कुठे मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करायचा आहे? आपला प्रेक्षकवर्ग नेमका कोणता आहे? याचा अभ्यासही करणे गरजेचे आहे.
-दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक, सुभेदारप्रेक्षकवर्ग, स्थळ यांचा चित्रपट प्रदर्शनापूर्वी अभ्यास आवश्यक
चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा बदलण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे शासनाकडून जो नियम लागू करण्यात आला आहे की, मराठी चित्रपटांना एक स्क्रिन देणे अनिवार्य आहे. हा नियम सोयीनुसार पाळला जातो किंवा जात नाही. दुसरी बाब म्हणजे, प्रेक्षकांचा प्रतिसाद, त्यांच्या आवडीसोबत आर्थिकदृष्ट्यादेखील फार महत्त्वाचा असतो. हिंदी चित्रपटांच्या वितरणासाठी उपलब्ध असणारा निर्मिती खर्च आणि मराठी चित्रपटांकडे उपलब्ध असणारा खर्च यात फार तफावत आहे. याचं कारण असं की, ’बॉक्स ऑफिस’वर तो चित्रपट किती कमाई करतो आणि दुसरे म्हणजे, मराठी प्रेक्षकांचा आवाका फार लहान आहे. त्यातही त्यांना इतर भाषिक आशयाचा आस्वाद घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपला चित्रपट चालण्यासाठी त्या तारखांना इतर कोणते मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत की नाही, याचा अभ्यास करून मगच तारीख निश्चित करावी लागते. याव्यतिरिक्त दिग्दर्शक, निर्माते यांनी आपला चित्रपट महाराष्ट्रात नेमका कुठे मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करायचा आहे? आपला प्रेक्षकवर्ग नेमका कोणता आहे? याचा अभ्यासही करणे गरजेचे आहे.
-दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक, सुभेदार
हा व्यवसाय समजून घेऊनच या क्षेत्रात उतरावे
जितक्या मोठ्या संख्येने हिंदी चित्रपटांची निर्मिती संस्था चित्रपटगृहे घेते, तितकी आर्थिक ताकद मराठी चित्रपटांकडे नसल्याने आपण एक पाऊल मागे आहोत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, जर का हिंदी चित्रपटात मोठा कलाकार असेल आणि त्याचवेळी सुट्ट्या असतील तर नक्कीच प्रेक्षक हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांकडे अधिक ओढला जातो. एकीकडे प्रेक्षकांची मराठीत चांगले चित्रपट येत नाहीत, अशी तक्रार असते, तर दुसरीकडे विविध विषयांवर भाष्य करणारे, दिग्दर्शकीय अंगाने, तांत्रिक बाजूने निरनिराळे प्रयोग करणारे मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले जातात. पण, प्रेक्षक त्याकडे पाठ करून इतर भाषिक चित्रपटांकडे आकर्षित होतो; तरीही मराठी दिग्दर्शक आणि कलाकार चांगल्या कलाकृती साकारणं थांबवत नाहीत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, एखाद्या मराठी चित्रपटाच्या समोर मोठा हिंदी चित्रपट आला, तर स्क्रिन्स फारशा दिल्या जात नाहीत. कारण, आर्थिक बाजू मराठी चित्रपटांची कमकुवत होते, असे थिएटर मालकांचे म्हणणे असते. कारण, चित्रपट पाहायला प्रेक्षक आलेच नाहीत, तर स्क्रिन्स वाढवून उपयोग काय? असा मोठा प्रश्नदेखील चित्रपट वितरक आणि निर्मात्यांपुढे उभा राहतो. अर्थात, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट लावणे आणि तो चालवणे हा एक व्यवसाय आहे आणि तो समजूनच या क्षेत्रात उतरले पाहिजे.
- देवेंद्र गायकवाड, दिग्दर्शक, चौक
इतर भाषिक चित्रपटांपुढे मराठी चित्रपटांची माघार सर्वस्वी दुर्दैवी
प्रदर्शित होणार्या मराठी चित्रपटाबरोबर अन्य कोणता चित्रपट प्रदर्शित होणार आहे, या बाबीचा निश्चितच मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांवर परिणाम होतो. जर का समोर मराठी चित्रपटच असेल, तर परस्पर सामंजस्याने चित्रपट प्रदर्शनाची तारीख निश्चित केली जाते. पण, महाराष्ट्रातच इतर भाषिक चित्रपटांपुढे मराठी चित्रपटांना माघार घ्यावी लागते, ही बाब दुर्दैवी आहे. बर्याचदा चित्रपट वितरकांकडून सांगण्यात येते की, हिंदी अथवा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होत असल्याकारणाने मराठी चित्रपटांना तितकासा प्रतिसाद आर्थिक स्वरुपात मिळणार नाही. त्यामुळेदेखील मराठी चित्रपटांना माघार घ्यावी लागते. चित्रपट चालणे म्हणजे काय? तर सर्वात आधी चित्रपट सामान्य नागरिकांसासह चित्रपट समीक्षकांनादेखील आवडला पाहिजे. या दोन्ही गटांतील प्रेक्षकांची दाद जर का सकारात्मक मिळाली, तर नक्कीच चित्रपट आशयाच्या जोरावर अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
- भाऊराव कर्हाडे, दिग्दर्शक, टीडीएम
...अन्यथा या स्पर्धेत मराठी चित्रपट नाहीसा होईल!
ज्यावेळी दिग्दर्शक आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करतो, त्यावेळी तो सांगोपांग विचार करूनच निर्णय घेत असतो. ’रावरंभा’ चित्रपटाच्यावेळी कोणताही चित्रपट आजूबाजूला नसल्यामुळे प्रदर्शनाची तारीख ठरवली होती. मात्र, अचानक ’द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले आणि चित्रपटगृहातील सारा खेळच बदलला. अशावेळी मनासारखे शो आणि स्क्रिन्स मिळत नाही. जर का शो मिळवायचे असतील, तर मराठी चित्रपटांना कायमच झुकतं माप घ्यावं लागतं, तरच या मनोरंजनविश्वात आमचा टिकाव लागेल, अन्यथा या स्पर्धेत मराठी चित्रपट नाहीसा होईल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्रातील प्रेक्षक मराठी चित्रपटांना प्रथम प्राधान्य देत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच महाराष्ट्राच्या गावातील आणि शहरातील थिएटरमध्ये चित्रपट लागला, त्याने एकूण किती कमाई केली आणि चित्रपट निर्मिती खर्च आणि ’बॉक्स ऑफिस’वरील ’कलेक्शन’ याची गोळाबेरीज करून चित्रपटाने किती कमावले, ही आकडेवारी ज्यावेळी समोर येते, जर ती आशादायक असेल, त्याचवेळी मराठी चित्रपट खर्या अर्थाने चालतो.
- अनुप जगदाळे, दिग्दर्शक, रावरंभा
मराठी चित्रपट चालावे ही जबाबदारी कलाकार आणि प्रेक्षकांची!
‘एकदा येऊन तर बघा’ हा माझा पहिला दिग्दर्शित चित्रपट. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाच्या गणिताचा गाढा अभ्यास माझा झाला नव्हता. पण, एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे, मराठी नाटकांच्या बाबतीत ठरावीक संख्येचे प्रेक्षक हे नाटक पाहायला आवर्जून येतात आणि सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये एक प्रेक्षकवर्ग तयार होतो. पण, चित्रपटांच्या बाबतीत काही दिवसांचा किंवा एका आठवड्यांचा खेळ असतो. एका आठवड्यात चित्रपटाने कमाई केली नाही, तर थिएटरमधून तो चित्रपट उतरवला जातो. त्यामुळे बहुभाषिक चित्रपटांच्या या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी तग धरून राहण्याची वेळ आली आहे आणि त्याची जबाबदारी ही चित्रपट तयार करणार्या कलाकारांनी आणि प्रेक्षकांनीदेखील घेतली पाहिजे.
- प्रसाद खांडेकर, दिग्दर्शक, एकदा येऊन तर बघा
रसिका शिंदे-पॉल