वनविभागाने बचावकार्य केले मात्र 'तो' कोल्हा जंगलातुन पुन्हा परतला...

18 Nov 2023 13:47:03


jackal sangli



मुंबई (विशेष प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावातुन शनिवार दि. १८ नोव्हेंबर रोजी एका कोल्ह्याचे रेस्क्यू केले गेले. रेस्क्यूनंतर जंगलात मुक्त अधिवासात सोडलेला हा कोल्हा पुन्हा मानवी वस्तीत आला. हा कोल्हा सध्या वनविभागाच्या ताब्यात असून पुढील कारवाई वनविभागाकडुन करण्यात येईल.


गोटखिंडी गावात असलेल्या ऊसतोड कामगारांनी कोल्हा पाळला असल्याचे एका महिलेने नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीला (नेकॉन्स) फोनवरून कळवले. नेकॉन्सने वनविभागाला याबाबत कळवले असता सांगलीचे सहाय्यक उप-वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांनी तात्काळ इस्लामपुर वनविभागाला घटनेची माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले. इस्लामपूर वनविभागाचे वनरक्षक कोळेकर यांनी घटनास्थळी जाऊन हा कोल्हा ताब्यात घेतला. ऊसतोड कामगारांतील एका कुटूंबाने या कोल्ह्याला दोरीने बांधुन ठेवले होते. दोरीने बांधलेल्या या कोल्ह्याला फरपटत नेत त्याचे हाल करत आहेत अशी माहिती महिलेने फोनवरून कळवली होती. त्याप्रमाणे चौकशी केली असता साधारण दिड वर्षापुर्वी पिल्लू असताना हा कोल्हा सांगलीतुनच पकडल्याचे कुटूंबातील मुलाने मान्य केले.


सांगलीतील एका भागात ऊसतोड करताना ऊसाच्या आत पिल्लू आढळले पण कोल्ह्याची पिल्ले जन्मतः कुत्र्यासारखी दिसत असल्यामुळे कुत्रा समजुनच या कोल्ह्याला कुटूंबाने पाळले होते. दिड वर्ष या कुटूबांबरोबर सहजीवन घालवलेल्या या कोल्ह्याला वनविभागाने ताब्यात घेऊन जंगलात लांब सोडले खरे पण, माणसाळलेल्या या कोल्ह्याने पुन्हा घरची वाट धरली. जन्मापासुन माणसांमध्ये राहिल्यामुळे या कोल्ह्याचे पुन्हा रिवाईल्डींग करणे (जंगलाच्या अधिवासात जगणे) शक्य नाही. माणसाळलेला हा कोल्हा सध्या वनविभागाच्या ताब्यात असून त्याला कॅप्टीव्हीटी म्हणजेच बंध अधिवासात प्राणीसंग्रहालय किंवा तत्सम पर्यायांमध्ये सोडणं हाच पर्याय उपलब्ध राहतो, अशी माहिती नेचर कॉन्झरवेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हर्षद दिवेकर यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.

"जंगली प्राणी असल्यामुळे तो कितीही माणसाळला तरी त्याची मूळ वैशिष्ट्ये सोडत नाही. कोल्हे पिसाळल्यानंतर तो चावू शकतो आणि वन्यप्राणी असल्यामुळे रेबीज होण्याचा धोका ही अधिक असते. त्यामुळे लोकांमध्ये कोल्हा आणि कुत्र्याची पिल्ले यांच्यातला सुक्ष्म फरकांबद्दल जनजागृती होणे गरजेचं आहे जेणेकरून वन्यजीव आणि मानव दोघांनाही सोयीचे होईल."

- डॉ. हर्षद दिवेकर
संस्थापक अध्यक्ष,
नेचर कॉन्झरवेशन सोसायटी



Powered By Sangraha 9.0