मुंबई : 'वर्ल्ड हिंदू फाउंडेशन'तर्फे दर चार वर्षांनी 'वर्ल्ड हिंदू काँग्रेस' संमेलन आयोजित केली जाते. यावर्षी बँकॉक येथील इम्पॅक्ट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे तीन दिवसीय (दि. २४ ते २६ नोव्हेंबर) संमेलन होणार आहे. दरम्यान शिक्षण, शैक्षणिक संस्था, प्रसारमाध्यमे, राजकारण, महिला आणि तरुणांशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात येईल. एकूण ६ सत्रांमध्ये हे चर्चासत्र भरेल.
या सहा सत्रांमध्ये नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स, वाढत्या अर्थव्यवस्थेमध्ये दर्जेदार शिक्षण, पाश्चात्य शैक्षणिक तत्त्वांमधील समस्या, तंत्रज्ञानावर आधारित माध्यमांचे नियमन, सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेल्या मनोरंजनाचे महत्त्व, हिंदू ओळख, हिंदू मंदिरे आणि भूमींची मुक्ती आणि मानवी हक्क या विषयांवर विशेष भर दिली जाईल. संमेलनात सहभागी होण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यावेळी माता अमृतानंदमयी यांच्यासह सामाजिक-धार्मिक संस्थांचे प्रमुख व इतर मान्यवर वक्ते म्हणून आपले विचार मांडणार आहेत.
६६ राष्ट्रांतील हिंदूंचा सहभाग
बँकॉक येथे होणाऱ्या या संमेलनात ६६ राष्ट्रांतील हिंदू सहभागी होणार आहेत. केवळ भारतीय हिंदू नव्हे तर जगभरातील हिंदू मंडळी या संमेलनात सहभागी होणार आहेत. जगभरातील सर्व हिंदूंना संघटित करणे, हा यामागचा मुळ उद्देश आहे. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम, पॉलिटिकल फोरम, मीडिया फोरम, डेमोक्रॅटिक फोरम, युथ फोरम, वुमेन फोरम तसेच जगभरातील मंदिरांचे फोरम या सर्व आयामांवर संमेलनात चर्चा होईल.
- स्वदेश खेतावत, जनरल सेक्रेटरी, वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२६