ओळख दिवाळी अंकाची

18 Nov 2023 22:02:20
Various Diwali Ank Published 

दिवाळी अंक हे महाराष्ट्राच्या साहित्यिक परंपरेतील एक समृद्ध पर्व. गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ ही संपन्न परंपरा अव्याहतपणे व्यासंगी सारस्वतांनी, साहित्यप्रेमींनी पुढे नेली आणि आजही हजारो दिवाळी अंक महाराष्ट्राच्याच नव्हे, तर अगदी देश-विदेशातही पोहोचलेले दिसतात. काही दिवाळी अंकांनी काळानुरुप डिजिटल साजही चढवला. त्यानिमित्ताने अशाच काही दिवाळी अंकांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न...

सा. विवेक

सा. ‘विवेक’चा दिवाळी अंक म्हणजे दरवर्षीप्रमाणे बौद्धिक, वैचारिक फराळाची मेजवानीच! यंदाच्या दिवाळी अंकातही ‘इंडिया विरुद्ध भारत की इंडिया आणि भारत’ हा दिलीप करंबेळकर यांचा चिंतनशील लेख या विषयावर एक नवीन दृष्टिकोन प्रदान करून जातोे. रमेश पतंगे यांनी ‘दोन देश, दोन राष्ट्रनायक’ या लेखातून अमेरिकेचे राष्ट्रपुरूष अब्राहम लिंकन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मांडलेली अभ्यासपूर्ण साम्यस्थळेही तितकीच विचारगर्भ. त्याशिवाय दीपक जेवणे यांचा ‘पंचाहत्तर वर्षांचा चिरतरूण’ हा सा. ‘विवेक’चाच आजवरचा प्रवास उलगडणारा मनोगतपर लेखही तितकीच ‘विवेक’प्रति आपुलकी वाढवणारा ठरावा. त्याशिवाय दीपाली पाटवदकर यांनी रांगोळीचे चितारलेले कलारंग, शेफाली वैद्य यांनी उलगडलेले नृसिंहशिल्पांचे भावाविष्कार, कार्नाक आणि कोणार्क मंदिरांचा रवि वाळेकर यांनी घेतलेला धांडोळाही तितकाच कलासंपन्न. देशाची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’, महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेली ‘महर्षी कर्वे शिक्षण संस्था’ यांचा आढावा घेणारे लेखही तितकेच वाचनीय. ‘कुटुंबातील वाढता विसंवाद ः कारणे आणि उपाय’ हा मान्यवरांचा परिसंवादही या विषयाचे विविध पैलू वाचकांसमोर मांडून जातो. एकूणच आकर्षक मुखपृष्ठ, हिरवीगार कृषी विवेक पुरवणी आणि कथा, कवितांनी भरलेला हा दिवाळी अंक वाचनसुख प्रदान करणारा असाच!
कार्यकारी संपादक ः अश्विनी मयेकर, मूल्य ः २०० रु., पृष्ठसंख्या : ३१२

महानगरी वार्ताहर

यंदाचे वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेकाचे वर्ष. त्यानिमित्ताने ‘महानगरी वार्ताहर’चा दिवाळी अंक ‘हिंदू साम्राज्य’ या संकल्पनेला समर्पित आहे. या दिवाळी अंकाच्या निमित्ताने शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याशी निगडित विविध पैलूंचे अभ्यासपूर्ण विवेचन आपल्याला या दिवाळी अंकात वाचायला मिळेल. शिवराज्याभिषेकाचे महत्त्व, शिवकालीन आरोग्य व्यवस्था यांसह हिंदू साम्राज्यातील अर्थविचार, सामाजिक एकात्मता आणि हिंदू साम्राज्य, हिंदूराष्ट्र जागरण हे लेख वाचनीय ठरावे. त्याचबरोबर रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणावर आधारित ‘हिंदू साम्राज्य दिवस’ हा लेखही तितकाच उद्बोधक. त्याशिवाय डॉ. शरद हेबाळकर, रमेश पतंगे, अक्षय जोग, सुहास जोशी यांचेही हिंदू साम्राज्याशी निगडित विविध पैलू वाचकांसमोर मांडणारे लेखही माहितीपूर्ण झाले आहेत. ‘महाराजांची राजचिन्हे’ या लेखातून कित्येक परिचित-अपरिचित राजचिन्हांची शास्त्रशुद्ध माहितीही नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, यात शंका नाही. तेव्हा ‘हिंदू साम्राज्य’ या संकल्पनेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न या दिवाळी अंकाच्या निमित्ताने संपादकांनी केला आहे, हे अंक वाचताना विशेषत्वाने दिसून येते.
संपादक ः सतीश सिन्नकर, मूल्य ः २०० रु., पृष्ठसंख्या : १७२

कालनिर्णय - सांस्कृतिक दिवाळी २०२३

विषयवैविध्य आणि कसदार लेखक हे ‘कालनिर्णय’च्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य. यंदादेखील हीच विषय विविधता ‘कालनिर्णय’च्या दिवाळी अंकामध्ये ठायी ठायी दिसून येते. एरवी पर्यावरणासारख्या गंभीर विषयावरील लेखाला अग्रक्रम न देता, अंकातील समारोपाचे वगैरे स्थान दिले जाते. परंतु, संपादकांनी अतुल देऊळगावकर यांच्या ‘पृथ्वी अत्यवस्थ’ या पर्यावरणाची सद्यःस्थिती कथन करणार्‍या परखड लेखातून मानवजातीच्या डोळ्यात अंजन घालण्याचे केलेले काम सर्वस्वी कौतुकास्पदच. त्याचबरोबर मॅक्सवेल पर्किन्स या ‘लेखकांचा संपादक’ म्हणून ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्वाचे निळू दामले यांनी रेखाटलेले चित्रणही तितकेच लक्षवेधी ठरावे. ‘ओनली अमिताभ’, ‘रंगधुरंधर विद्याधर’, ‘जोगती परंपरेतील दंतकथा मंजम्मा’, ‘चिनी कूटनीती’, ‘ती एक योगिनी’ हे लेखही विशेष उल्लेखनीय. चंद्रशेखर नेने यांनी भारताचा इतिहास बदलणार्‍या पालखेडच्या लढाईचे टिपलेले बारकावे हे बाजीराव पेशव्यांच्या युद्धकौशल्याचे आणि त्यांच्यातील रणनीतीकाराचे अफाट कर्तृत्व अधोरेखित करणारे असेच. त्याशिवाय मुंबई मेट्रो-३च्या निर्मितीचा आव्हानांनी भरलेला प्रवास उलगडणारा अनिकेत जोशी यांचा लेखही तितकाच वाचनीय. तसेच जुगाराच्या मानसशास्त्राची उकल करणारा, मध्य प्रदेशातील ओरछाची सांस्कृतिक सफर घडविणारा आणि बंगालमधील ‘सरस्वती प्रेस’चा प्रवास हे लेखही वाचनशुधा शमवणारेच. त्याशिवाय कविता, हायकू आणि विनोदांच्या फोडणीने ‘कालनिर्णय’चा दिवाळी अंक नटलेला आहे.
संपादक ः जयराज साळगावकर, मूल्य ः २५० रु., पृष्ठसंख्या ः २४६

मराठी विज्ञान परिषद पत्रिका - दीपावली विशेषांक

विज्ञानाच्या प्रचार-प्रसाराचे गेली कित्येक वर्षे अव्यातहपणे काम करणारी संस्था म्हणजे ‘मराठी विज्ञान परिषद.’ विज्ञानाची नव्या पिढीला गोडी निर्माण व्हावी, त्यांनीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या अवतीभवती पाहावे आणि एकूणच विज्ञानवादी जन घडावे, हाच या संस्थेचा उद्देश. याच हेतूने ‘मराठी विज्ञान परिषदे’ने प्रसिद्ध केलेला दिवाळी अंक एक स्तुत्य प्रयत्न म्हणावा लागेल. मर्फीचा नियम, जगावेगळ्या जमाती, अजस्त्र दुर्बिणी, सिनेकॅमेर्‍यांची उत्क्रांती, हरित हायड्रोजन, आधुनिक वैद्यकीय निदान पद्धती यांसारखे विविध विज्ञान आधारीत विषयांवरील लेख वाचनीय ठरावे. विशेष म्हणजे, हे लेख शास्त्रीय माहिती देणारे असले तरी शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही त्यांचे सहज आकलन होईल, अशा शब्दांत लेखकांनी शब्दबद्ध केले आहेत. त्याशिवाय विज्ञानकथा, लहान मुलांसाठीचे ’गंमत जंमत’ हे सदर आणि महाशब्दकोडेही तितकेच रंजक ठरावे. अशाप्रकारे केवळ वैज्ञानिक मजकुरावर आधारित दिवाळी अंक प्रसिद्ध करणे, हे तसे आव्हानात्मकच. पण, ‘मराठी विज्ञान परिषद’ हे वैज्ञानिक जागृतीचे कार्य अव्याहतपणे करीत आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुकच. परंतु, या अंकात वैज्ञानिक अनुषंगाने आणखीन काही संशोधनपूर्ण साहित्याची मेजवानी मिळाली असती, तर वाचनाचा हा आनंद द्विगुणित झाला असता, हेही तितकेच खरे!
कार्यकारी संपादक ः शशिकांत धारणे, मूल्य ः १५० रु., पृष्ठसंख्या ः १५२

Powered By Sangraha 9.0