नवी दिल्ली : विविध पदार्थांना हलाल प्रमाणपत्र देऊन त्यातून प्राप्त होणाऱ्या पैशांचा वापर देशविरोधी कृत्यांसाठी करण्याच्या आरोपाखाली ९ कंपन्यांविरोधात उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एफआयआर नोंदविण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
तेल, साबण, टूथपेस्ट, मध आणि इतर अनेक शाकाहारी उत्पादनांनादेखील हलाल प्रमाणपत्र देण्याच्या धंदा चालविणाऱ्या कंपन्यांविरोधात योगी सरकार लवकरच कठोर कारवाई करणार आहे. हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या ९ कंपन्यांविरुद्ध लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शैलेंद्र शर्मा यांनी कंपन्यांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याविरुद्ध कलम १२० ब/ १५३ए/ २९८/ ३८४/४२०/४६७/ ४६८/४७१/५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतात एफएसएसएआय आणि आयएसआय सारख्या संस्थांना उत्पादनांची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई, जमियत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट दिल्ली, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया मुंबई, जमियत उलेमा महाराष्ट्र मुंबई आदींसह एकूण ९ कंपन्या धर्माच्या नावावर काही उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र देत असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
देशविरोधी कृत्यांसाठी वापर
हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली जमा केलेल्या बेकायदेशीर कमाईतून दहशतवादी संघटना आणि देशविरोधी कारवायांना निधी दिला जात असल्याची शंका तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामागे सुनियोजित गुन्हेगारी कारस्थान असून हलाल प्रमाणपत्र न घेणाऱ्या कंपन्यांचे आर्थिक नुकसान करण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.