लखनौ : क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीतील मोहम्मद शमीच्या चमकदार कामगिरीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अमरोहा जिल्ह्यातील सहसपूर गावात क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जमिनीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाच्या सदस्यांपैकी एक असलेल्या शमीने उपांत्य फेरीत ७ विकेट्स घेऊन रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. विश्वचषकात तो आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.
मोहम्मद शमी हा मूळचा उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील आहे, पण तो पश्चिम बंगाल संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. तो आयपीएलमध्ये गुजरात संघाकडून खेळत आहे. मोहम्मद शमीने या विश्वचषकात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याने केवळ ५ सामन्यात २३ विकेट घेतल्या असून विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी सीडीओ अश्वनी कुमार मिश्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी जोया डेव्हलपमेंट ब्लॉकमध्ये असलेल्या शमीच्या गावाला भेट दिली. स्टेडियमसाठी जमिनीचा शोध घेतला. त्यांचे घर जोया विकास गटातील सहसपूर नवाब येथे आहे. आता या गावात भव्य क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे.
योगी आदित्यनाथ सरकारद्वारे क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामामुळे परिसरात क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा निर्माण होतील, तरुणांमध्ये चैतन्यशील क्रिकेट संस्कृतीला चालना मिळेल आणि नवोदित प्रतिभांना त्यांच्या क्रिकेटच्या आकांक्षांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
याव्यतिरिक्त, हे स्टेडियम एक महत्त्वाची खूण म्हणून काम करण्याची शक्यता आहे, ह्या गावाचे भारतीय क्रिकेटमधील योगदान आणि मोहम्मद शमी सारख्या प्रसिद्ध क्रिकेट खेळाडूंशी असलेले संबंध यांचे प्रतीक आहे. जिल्ह्याचे प्रभारी मंत्री संजयसिंह गंगवार यांनीही आपल्या गावाचा विकास करण्याची भाषा केली आहे. प्रशासनाने युवक कल्याण विभागाच्या वतीने गावात मिनी स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे.