नवी दिल्ली : दिल्लीतील समाजसेविका जसप्रीत कौर यांनी काँग्रेसची युवा शाखा भारतीय युवक काँग्रेसद्वारे दिला जाणारा 'इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार' स्वीकारण्यास नकार दिला आहे. काँग्रेस हा सर्वात भ्रष्ट पक्ष असून शीख नरसंहाराला तोच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जसप्रीत कौर यांनी शुक्रवारी 'X' वर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी यात लिहिले की, "मी इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार देते कारण हा पुरस्कार भारतीय युवक काँग्रेसचा आहे. भारतीय युवक काँग्रेस हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे आणि शीख नरसंहारासाठी जबाबदार आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
जसप्रीत कौर दिल्लीमध्ये 'तेजस फॉर चेंज फाउंडेशन' नावाची एक संस्था चालवतात. या संस्थेच्या माध्यमातून त्या गरीब, वंचित आणि अपंग मुले आणि तरुणांसाठी काम करतात. तर इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार हा भारतीय युवक काँग्रेसकडून समाज कल्याणासाठी कार्य करणे, शिक्षण, कला, संस्कृती आणि क्रीडा अशा अनेक क्षेत्रात योगदान देणाऱ्या तरुणांना दिला जातो. १९९५ मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली असून तो दरवर्षी दिला जातो.