नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) २८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘रायगड ते इंद्रप्रस्थ’ (दिल्ली) अशी ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ काढण्यात येणार आहे.देशाची राजधानी येथे ७ ते १० डिसेंबर या कालावधीत अभापविपचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी अभाविपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘हिंदवी स्वराज्य यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती अभाविपतर्फे पत्रकारपरिषदेत देण्यात आली.
यात्रेस महाराष्ट्रातील रायगड येथून २८ नोव्हेंबर रोजी प्रारंभ होणार आहे. ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी, स्वराज्याची राजधानी रायगड यासह इंदूर, कानपूर, आग्रा आणि इंद्रप्रस्थ अर्थात दिल्ली असा प्रवास करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधून जाणारी ही यात्रा सुमारे दोन हजार किमीचा प्रवास करून देशाची राजधानी दिल्ली येथे दाखल होणार आहे. यात्रेच्या मार्गावर येणाऱ्या प्रमुख ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याद्वारे तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित विविध पराक्रमी पैलूंची माहिती करून दिली जाणार आहे.
अभाविप राष्ट्रीय अधिवेशनाच्या स्वागत समितीचीही घोषणा यावेळी करण्यात आली आहे. प्रसिद्ध उद्योजक निर्मल कुमार मिंडा यांची स्वागत समितीच्या अध्यक्षपदी, भाजप नेते आशिष सूद यांची स्वागत समितीचे सरचिटणीस आणि राजीव बब्बर यांची स्वागत समिती मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ७५ सदस्यीय स्वागत समितीमध्ये मान्यवर वकील, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती आणि राजकीय नेत्यांचा समावेश आहे.