सार्वजनिक उद्यानावर जामा मशिदीचे अतिक्रमण! दिल्ली उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला फटकारले

18 Nov 2023 13:20:53

Jama Masjid


नवी दिल्ली :
दिल्लीतील जामा मशिदीजवळ असलेल्या सार्वजनिक उद्यानावर मशिदीने बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. याप्रकरणी सुनावणी सुरु असताना दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली महानगरपालिकेला फटकारले आहे. महानगरपालिकेने यावर कोणतीच कारवाई का केली नाही? असा सवाल न्यायालयाने केला आहे.
 
मोहम्मद अर्सलान नावाच्या व्यक्तीने याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतच्या सुनावणीदरम्यान महानगरपालिकेने उच्च न्यायालयाला सांगितले की, "जामा मशीद आणि शाही इमाम यांनी सार्वजनिक उद्यानावर अतिक्रमण केले आहे. हे उद्यान बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असून ते त्याला कुलूपही लावत असतात."
 
तसेच ते महानगरपालिका अधिकार्‍यांना वजूखानाजवळील उद्यानात प्रवेश देत नाहीत. यासोबतच दिल्ली वक्फ बोर्डाकडूही हे उद्यान आपली मालमत्ता असल्याचा दावा करण्यात येत असल्याचे महानगरपालिकेच्या वकिलाने सांगितले. दरम्यान, सार्वजनिक उद्यान ताब्यात घेण्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत दिल्ली महानगरपालिकेला फटकारले आहे.
 
न्यायालयाने म्हटले की, “कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक उद्याने ताब्यात घेतली जाऊ शकत नाहीत. २१ व्या शतकात तुम्ही आम्हाला काय सांगू इच्छित आहात? आपण दररोज पर्यावरण रक्षणाबद्दल बोलत असतो. एकीकडे आपल्याला श्वास घेणं जड जातंय आणि तुम्ही उद्यानाचा ताबा गमावत आहात. तुम्ही अशा सार्वजनिक उद्यानाचा ताबा गमावू शकत नाही."
 
"आपण अशा देशात नाहीत जिथे कायद्याचे राज्य नाही. आपण २१ व्या शतकात जगत आहोत," असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच महानगरपालिकेने सार्वजनिक उद्यानाचा ताबा परत मिळवण्यासाठी कायद्यानुसार पावले उचलावीत. गरज भासल्यास पोलिसांचीही मदत पुरवली जाईल, असे न्यायालयाने सांगितले आहे.



Powered By Sangraha 9.0