नेत्यांना गावबंदी करता, महाराष्ट्र सातबारावर लिहून दिला आहे का?दादागिरी बंद करा, सरकार आणि कायदा आहे की, नाही? दोन महिने आम्ही सहन करतो आहोत,अशा शब्दात एकीकडे छगन भुजबळांनी एल्गार सभेत भुमिका मांडली तर दुसरीकडे छगन भुजबळांना रोखावे अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिला.दि. १८ नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गार सभा आणि सकल मराठा समाजाची दसरा चौकात भव्य सभा झाली. या दोन्ही सभांचा विचार केला तर ओबीसी एल्गार सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार आशीष देशमुख, आमदार महादेव जानकर, ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी आणि अन्य नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या सभेला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज , माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. त्यामुळे आज आपण ह्या दोन्ही सभांचा आणि त्यात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचा आढावा घेणार आहोत.
रणरणत्या उन्हाची पर्वा न करता प्रचंड मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव आणि मराठा बांधवांनी या दोन्ही सभांना उपस्थिती लावली. अंबड येथील ओबीसी एल्गार सभाला तर १०० एकर मैदान गर्दीने तुडुंब भरले. रस्त्यावरही गर्दी होती. शहराच्या विविध भागातील पार्किग अपुरे पडल्याने वाहने रस्त्यावर लावण्यात आली. तर दुसरीकडे जरांगे पाटीलांनी सांगलीच्या दौऱ्यावर भरदुपारी तीन वाजता तापलेल्या उन्हात हजारोंच्या उपस्थितीत जनसमुदायाला तरुण भारत क्रिडांगणावर जाहिर सभेत संबोधित केले.त्यानंतर या दोन्ही सभेत जरांगे- भुजबळांनी एकमेंकावर काय टीका केली हे जाणून घेऊ? सांगलीच्या सभेत जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने आता ठरवले आहे, आम्ही त्याच्या टीकेला उत्तर देणार नाही. लोकांचे खाल्याने ते आतमध्ये जाऊन आले. त्यामुळे कोण कुणाचे खात आहे,हे सर्वांना ठाऊक आहे, अशी टीका पाटलांनी भुजबळांवर केली. तर त्याला प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले की, याद राखा माझ्या शेपटीवर पाय द्याचा प्रयत्न करू नका. कारण मी तुमच्यासारखं सासऱ्याच्या घरी भाकरीचे तुकडे मोडत नाही, अशी टीका भुजबळांनी जरांगेंवर केली. तसेच भुजबळसाहेब तुम्ही फक्त ताकद द्या , हा ओबीसी समाज गप्प बसणार नाही.
ओबीसीचे राज्य आणल्याशिवाय ओबीसी गप्प बसणार नाही, असे ओबीसी एल्गार सभेच्या मंचावरून प्रकाश शेंडगे म्हणाले. तर ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यापासून ओबीसींसाठी संघर्ष सुरु आहे. त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. तर दुसरीकडे मराठा समाजाला ७० वर्षांपासून आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. मराठा समाजाच्या वाट्याचे आरक्षण काही लोकांनी पळवून नेले. पण आता आम्ही तसे होऊ देणार नाही. मराठे कुणबी असल्याचे कागदोपत्री सिद्ध झाल्यामुळे त्यांना दाखलेही मिळण्यास सुरुवात झाली आहे. तरी आम्ही ओबीसींतूनच आरक्षण घेणार आणि सरकारला ते द्यावेच लागेल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. तर छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवाचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजात नसलेली भांडणं लावण्याचं पाप ते करत आहेत. त्यामुळे मंत्री पदावरून भुजबळांची हकालपट्टी करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.तर गोपीचंद पडळकर म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. काहींकडून ओबीसींची वाटमारी सुरु आहे.
ओबीसींची ही सभा पाहून ओबीसींच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे. देशात ओबीसी आरक्षणासाठी अनेक आंदोलने उभी राहिली त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले, असे ते म्हणाले. तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे सभेला अनुउस्थित होत्या, मात्र भाषणाच्या सुरुवातीलाच छगन भुजबळांनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली. ते म्हणाले की, आज मुंडे हयात असते तर ओबीसी बांधवांवर संघर्षाची वेळ आली नसती. तर दुसरीकडे आशीष देशमुख म्हणाले की, जो ओबीसीकी बात करेगा ओ महाराष्ट्र पे राज करेंगा. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही, असे देशमुख म्हणाले. आणि त्यांनी ओबीसी समाजासाठी सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांचा ही उल्लेख केला.
तर या सगळ्यात मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळ, पंजाबराव देशमुख वसतिगृह, राजर्षी शाहू विकास योजनेद्वारे हजारो कोटी मिळतात. मात्र ओबीसी महामंडळाला हजार कोटीदेखील मिळत नाहीत, असा मुद्दा ही भुजबळांनी उपस्थित केला. तसेच सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी केली. तर दुसरीकडे २४ डिसेंबरपर्यत आरक्षण दिले नाही, तर पुढील दिशा २५ डिसेंबरला ठरवू.
मात्र १ डिसेंबरपासून गावोगावी साखळी उपोषण करू, कुणबी पुरावे कुणी दाबून ठेवले याचे उत्तर द्या;अन्यथा स्वस्थ बसणार नाही,अशी भुमिका मनोज जरांगे पाटलांनी मांडली. एकंदरित काय तर मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसीला धक्का लागणार नाही, हे पाहिले पाहिजे. यासाठीचं आम्ही ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, असे मत भुजबळांचे होते. तर दुसरीकडे कुणबी असल्याचे पुरावे उपलब्ध झाल्याने त्याआधारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे, अशी भुमिका जरांगे पाटलांची होती. पण ह्यासगळ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाने आरक्षणाबाबत चिंता करु नये. कुठल्याही स्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. त्यामुळे दोन समाज आमने-सामने उभे ठाकतील, अशी स्थिती उद्भवू देऊ नये, असे आवाहन ही फडणवीसानी केले. तसेच दि. १८ नोव्हेंबर रोजी राज्यात मराठा-कुणबी , कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी स्थापन झालेली निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांची समिती राज्यभर दौरे करणार आहे. या दौऱ्यात कुणबी नोंदींचा आढावा घेण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक होणार आहे. यात आयोगाच्या कामकाजात वाढता शासकीय हस्तक्षेप, मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कावर होणारे परिणाम यांसह विविध विषयावर चर्चा होणार आहे.