विद्यार्थाशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न; धर्मांतराचाही दबाव! शिक्षिकेवर गुन्हा दाखल
18 Nov 2023 18:48:44
लखनऊ : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका मिशनरी शाळेतील शिक्षिकेवर दहावीच्या विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर धर्मांतरासाठी त्याचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात छावणी पोलिस ठाण्यात गुरुवारी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण सेंट अलॉयसियस शाळेतील असून पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यातील चॅटिंग व्हायरल झाली आहे. मुलाच्या चॅटिंगवरून त्याच्या कुटुंबियांना कळले की, आरोपी शिक्षिका शारिरीक संबंध ठेवण्यासाठी आणि ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत होती.
या संदर्भात शाळेत तक्रार केली असता, शिक्षिकेने तिचे हे कृत्य मान्य केले आणि नंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचू नये म्हणून मुलाला त्रास देण्यासाठी त्याचा पत्ता शोधण्यास सुरुवात केली. अशी माहिती पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिली आहे. याशिवाय आरोपी शिक्षिकेवर शाळेतील इतर विद्यार्थ्यांचे धर्मांतर केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच काही मीडिया पोर्टलवर पीडित मुलाचे छायाचित्र व्हायरल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.