मुंबईकरांचे पाणी महागणार?; पाणीपट्टीत आठ टक्के दरवाढीची शक्यता

    18-Nov-2023
Total Views |
 BMC Will water strip hike

मुंबई :
मुंबईकरांचे पाणी लवकरच महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईकरांना आकारण्यात येणार्‍या पाणीपट्टीत आठ टक्के दरवाढीसाठी जल अभियंता विभागाने मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर शनिवार, दि. २५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय होणार आहे. सदर प्रस्तावावर पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास त्याबाबत दि. १ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

मुंबईकरांना आकारण्यात येणार्‍या पाणीपट्टीत दरवर्षी जास्तीत जास्त आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय सन २०१२ मध्ये मुंबई महानगरपालिकेद्वारे घेण्यात आला होता. त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात पाणीपट्टीत जास्तीत जास्त आठ टक्के वाढ करण्यात येते आणि दि. १६ जूनपासून त्याची अंमलबजावणी केली जाते. पालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जल अभियंता विभागाचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला मिळाला असून येत्या शनिवारी त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

मुंबईकरांना सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासकीय खर्चाबरोबरच ऊर्जा खर्च आणि सरकारी तलावातून घेतलेल्या पाण्यावरील खर्चही वाढला आहे. त्याचप्रमाणे शुद्ध पाणी आणि त्यात टाकण्यात येणारी औषधे यांचा खर्चही वाढला असून, पालिकेला येत असलेल्या खर्चाच्या तुलनेत मुंबईकरांना पाणीपट्टी आकारली जाते. दरवर्षी या खर्चात वाढ होत असते. याचा आढावा घेऊन लेखापाल विभागामार्फत पाणीपट्टीत वाढ सुचवली जाते. गेल्यावर्षी पालिका प्रशासनाने ७.१२ टक्के वाढ केली होती. तर यंदा आठ टक्के पाणीपट्टी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.