राजीनाम्याबाबत अरविंद केजरीवालांचे मोठे विधान! म्हणाले, "मी १५ दिवस तुरुंगात..."
18 Nov 2023 12:42:04
नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चांगलेच अडचणीत सापडले असून त्यांना अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आता त्यांनी आपल्या अटकेबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मी १५ दिवस तुरुंगात राहिलो असून तुरुंगात जाण्यास घाबरत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, "आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही. मी १५ दिवस तुरुंगात राहिलेलो आहे. आत चांगली व्यवस्था आहे. त्यामुळे तुरुंगात जाण्याची भीती बाळगू नका, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, "भगतसिंग इतके दिवस तुरुंगात राहू शकतात. मनीष सिसोदिया ९ महिने तुरुंगात राहू शकतात. सत्येंद्र जैन एक वर्ष तुरुंगात राहू शकतात, त्यामुळे आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही, असेही ते म्हणाले. तसेच ४९ दिवस पदावर राहूनही स्वत:च्या इच्छेने राजीनामा देणारा मी जगातील पहिला मुख्यमंत्री आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
"मी माझा राजीनामा बुटाच्या टोकावर घेऊन फिरतो. त्यामुळे राजीनामा द्यायचा की, तुरुंगातून सरकार चालवायचे याबाबत मी लोकांशी चर्चा करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. येत्या १०-१५ दिवसांत दिल्लीच्या प्रत्येक घरात जाऊन जनतेला विचारायचे आहे की, राजीनामा द्यायचा की, तुरुंगातून सरकार चालवायचे. त्यानंतर जनता जे म्हणेल ते आम्ही करू," असेही त्यांनी म्हटले आहे.