देहरादून : उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका हिंदू तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी देहरादून पोलिसांनी अलीशासह तिच्या संपुर्ण कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित शर्मा असे २१ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माचे वडील महिपाल शर्मा यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या मुलाची मैत्रिण अलीशा आणि तिच्या कुटुंबियांनी त्याचा मानसिक छळ केला असून त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
२५ ऑक्टोबर रोजी रोहितने काहीतरी खाल्ले असल्याने त्याला बोलता येत नव्हते. रोहितचा फोन तपासला असता त्यात अलीशासोबतचे चॅटिंग सापडले. यामध्ये तिने लिहिले होते की, तिच्या कुटुंबियांना रोहित आणि तिच्याबद्दल माहिती झाले असून ते तिचे लग्न दुसऱ्याशी लावून देणार आहेत. त्यानंतर रोहित तिच्या घरी गेला. परंतू, तिथून परत आल्यावर त्याला उलटी झाली आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याच्या आईला त्याच्या खिशात उंदीर मारण्याचे औषध सापडले.
उपचारादरम्यान २ नोव्हेंबर रोजी रोहितचा मृत्यू झाला. देहरादून शहरातील पटेल नगर परिसरात ही घटना घडली. त्यानंतर रोहितचे वडील महिपाल शर्मा यांनी ४ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी अलीशा, तिचे वडील इम्तियाज, आई रेश्मा आणि मामा नदीम यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
महिपाल शर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, शेजारच्या पटेल नगर भागात राहणाऱ्या अलीशाने आपल्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर अलीशा आणि तिच्या कुटुंबियांनी रोहितला त्रास देत त्याला मारहाण केली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अलिशा आणि तिच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाला इतका मानसिक त्रास दिला की, त्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असा आरोप त्यांनी केला आहे.