बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थाला पोलीस छावणीचे स्वरूप

    17-Nov-2023
Total Views |
shiv-sena-chief-balasaheb-thackeray-death-anniversary

मुंबई :
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला, गुरुवारी रात्री शिवतीर्थावर शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पहायला मिळाले.

बाळासाहेबांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त दिग्गज नेत्यांसह हजारो शिवसैनिकांनी शिवतीर्थावर दाखल होत शिवसेना प्रमुखांना अभिवादन केले. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी घेत शिवाजी पार्क परिसरात ३०० जवान तैनात केले होते. ५० अधिकारीही दिमतीला होते.

'ज्या शिवसैनिकांना दर्शन घ्यायचे असेल, त्यांनी रांगेमध्ये यावे आणि स्मृती स्थळाचे दर्शन घ्यावे. मात्र, कोणीही वाद-विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल', असा इशारा परिमंडळ पाचचे उपायुक्त मनोज पाटील यांनी दिला होता. कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे शुक्रवारी दिवसभरात शिवतीर्थावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

अतिशय निंदनीय प्रकार

"छत्रपती शिवाजी पार्क येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. बाळासाहेबांचा स्मृतीदिन शांततेत साजरा होतो. महाराष्ट्रातून कार्यकर्ते येतात, नतमस्तक होतात आणि आपआपल्या गावी निघून जातात. कोणत्याही परिस्थितीत संघर्ष नको, स्मृतीदिनाला गालबोट लागू नये म्हणून मी, आमदार, खासदार शांतपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झालो. दर्शन घेतले आणि आम्ही निघून गेलो. पण, इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी निघत असताना उबाठाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक राडा करणे, घोषणाबाजी करणे, महिलांना धक्काबुक्की करणे ही बाब अतिशय निंदनीय आहे."
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांची शब्द सुमनांजली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खास व्हिडीओ पोस्ट करीत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. ‘हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नामक ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता निखारा १७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी शांत झाला. आज बाळासाहेबांची पुण्यतिथी. त्यांना वैकुंठवासी होऊन एक दशक उलटले; पण त्यांचे विचार अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहेत. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी झगडणाऱ्या बाळासाहेबांनी कायमच प्रखर हिंदुत्व आणि अखंड हिंदुस्थानाचे हात बळकट करण्यासाठी कष्ट उपसले. तत्व हाच प्राण आणि विचारांशी इमान हे बाळासाहेबांच्या राजकारणाचं मुख्य सूत्र होतं. राज्याच्या भल्यासाठी कठोर भूमिका घेणारे आणि वेळप्रसंगी फुलाप्रमाणे कोमल असणारे बाळासाहेब हे एक अजब रसायन होतं. आपल्या ठाकरी शैलीने भल्याभल्यांच्या ठिकऱ्या उडवून टाकणाऱ्या बाळासाहेबांनी उभ्या आयुष्यात कुणावरही व्यक्तीगत आकस बाळगला नाही. सर्जनशील व्यंगचित्रकार, अमोघ वक्तृत्व आणि तत्वनिष्ठ राजकारणी हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी वंदन’, अशी शब्द सुमनांजली देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली.

'मातोश्री' बंगला बाळासाहेबांचे स्मारक म्हणून खुला करा!

बाळासाहेब ज्या बंगल्यामध्ये अनेक वर्ष राहिले, तो मातोश्री बंगला जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे सध्या राहायला मातोश्री-२ वर गेले आहेत. जुन्या मातोश्री बंगल्यात बाळासाहेब अनेक वर्षे राहिले. अनेक धाडसी निर्णय ज्या बंगल्यात त्यांनी घेतले, दिवस रात्र त्यांचा ज्या स्थळी वावर होता, तेच खरे जिवंत स्मारक जनतेसाठी का खुले नाही, मातोश्री जनतेसाठी कधी खुली करणार, असा सवाल राम कदम यांनी केला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.