मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट एकामागोमाग येत आहेत. यापैकी काही चित्रपटांना प्रतिसाद मिळत आहे तर काहींना प्रेक्षकांची नाराजी पत्करावी लागत आहे. परंतु, रामायण हा खरं तर प्रत्येकाच्या जीव्हाळ्याचा विषय आहे. याच विषयावर दिग्दर्शक नितेश तिवारी रामायण चित्रपट भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर ‘केजीएफ’स्टार यश हा ‘रावण’ रुपात दिसणार आहे. तर, सीता मातेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी दिसणार असून अभिनेता सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचे समजत आहे.
गेले अनेक दिवस रामायण या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आधी मधु मंटेना या चित्रपटाची निर्मिती करणार होते. मात्र, चित्रपटातील कलाकारांच्या निवडीवरुन काही मतभेद झाल्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार मधू मंटेना यांनी या चित्रपटापासून निर्माता म्हणून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. सध्या नमित आणि त्यांच्या कंपनीच या चित्रपटावर काम करत असून नितेश तिवारी हे याचं दिग्दर्शन करणार आहेत.