मुंबई : अभिनेते नाना पाटेकरांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाराणसीत सध्या ते एका चित्रपटाचे चित्रिकरण करत असून यावेळी सेल्फी काढण्यासाठी आलेल्या फॅनला नाना पाटेकरांनी रागात डोक्यात टपली मारली होती. घडलेल्या या घटनेनंतर नानांना नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. परंतु, लोकांचा राग लक्षात घेता नानांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकरणाचे स्पष्टीकरण देत माफी देखील मागितली होती. मात्र, आता नानांनी ज्या मुलाला मारलं त्या मुलाची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून यात नानांनी मागितलेल्या माफीवरही त्याने भाष्य केले आहे.
काय म्हणाला हा तरुण?
"मी गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेलो होतो त्याचवेळी नाना पाटेकर तिथे शुटिंगला आल्याचे मला कळले. हे ऐकून मला खूप आनंद झाला. माझ्या आवडत्या कलाकारांपैकी ते एक आहेत. त्यामुळे मला त्यांच्यासोबत एक सेल्फी घ्यायचा होता. तिथे असलेल्या गार्ड आणि क्रू मेंबर्सनी मला थांबवायचा प्रयत्न केला. पण, मी इतका उत्साहात होतो की मी कोणाचं ऐकलं नाही", असं हा तरुण म्हणाला. पुढे तो म्हणतो, "मी फोटो काढण्यासाठी नानांच्या जवळ गेलो. पण, त्यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली ती मला फार अपमानास्पद वाटली. त्यानंतर त्यांनी मला पुन्हा बोलावलंदेखील नाही. पण, मी कोणतीही पोलिस तक्रार करणार नाही."
काय म्हणाले नाना पाटेकर?
“एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मी एका मुलाला मारतोय. हा सीन आमच्या चित्रपटाचाच भाग आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती. त्यात पाठीमागून एक जण म्हणतो ‘ए म्हाताऱ्या टोपी विकायची आहे का?’ मी त्यात टोपी घालून असतो. तो येतो मी त्याला पकडून मारतो आणि ‘नीट वाग, उद्धट बोलून नकोस’ असं म्हणतो. त्यानंतर तो जातो. एक रिहर्सल केली, नंतर दिग्दर्शकाने पुन्हा रिहर्सल करायला सांगितलं. आम्ही सुरू करणार इतक्यात या व्हिडीओत दिसणारा मुलगा तिथे आला. मला माहीत नव्हतं की हा मुलगा कोण आहे, मला वाटलं आमच्या टीममधला आहे. त्यामुळे सीननुसार मी त्याला मारलं आणि माझा डायलॉग म्हटला. नंतर मला कळालं की हा आमच्या टीममधला माणूस नाही. मग मी त्याला बोलवायला जात होतो, पण तो पळून गेला. त्याच्या मित्राने वगैरे हा व्हिडीओ शूट केला असेल.”
पुढे ते असे देखील म्हणाले की, “मी कधीच कुणाला फोटोसाठी नाही म्हटलेलं नाही. मी इथेही हजारो फोटो काढले, तिथे वाराणसीत घाटावर खूप गर्दी असते. हे चुकून झालं, मला माहीत नाही तो कुठून आला, मी आमच्या टीमचा माणूस समजून रिहर्सलचा सीन शूट केला. या व्हिडीओमुळे कोणताही गैरसमज झाला असेल तर मला माफ करा, मी असं कधीच कुणाला मारत नाही, आजपर्यंत मी कधीच असं केलेलं नाही. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे मी असं कृत्य कधीच करणार नाही. मी टीमला सांगितलं की त्याला बोलवा मी त्याची माफी मागतो. टीमने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सापडला नाही. तो रिहर्सलच्या मधे शिरला होता, त्यामुळे त्याला वाटलं असेल की हे लोक कदाचित आणखी मारतील, त्यामुळे तो पळून गेला असावा. पण खरंच मला माफ करा मी कधीच असं वागत नाही. घाटावर गर्दी शुटिंग करताना लोक खूप मदत करतात. आम्ही तिथे आणखी १०-१५ दिवस शुटिंग करणार आहोत,” असे स्पष्टीकरण नाना पाटेकर यांनी दिले.