ठाणे : तुटपुंजा मानधनावर खेडोपाडी, शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे १६ हजार कंत्राटी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर हे गेल्या १५ वर्षापासुन काम करीत असून कोरोना काळातही देवदूताचे काम केले. या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसह सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी गेल्या २२ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी आज धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केला.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम, जीएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. आरोग्यमंत्र्यांनी ३० टक्के कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचे आश्वासन आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनानंतर दिले होते.
सात महिने झाले तरी अद्याप त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे १६ ऑक्टोबरपासून राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. राज्यभरात १६ हजार कर्मचारी असून ठाणे जिल्ह्यातील दोन कंत्राटी कर्मचारी हे बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ शिवकुमार हकारे यांनी दिली.