चंदीगढ : हरियाणातील नुहानमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. यावेळी विहिरीची पूजा करण्यासाठी जाणाऱ्या महिलांवर मदरशातून दगडफेक करण्यात आली. दि.१६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी उशिरा घडलेल्या या घटनेत तीन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नुहान येथील कम्युनिटी मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर दोन्ही समाजाचे लोक तेथे जमा झाले. दगडफेकीचे वृत्त मिळताच नुहानचे पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजानिया हे मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी लोकांना शांततां राखण्याचे आवाहन केले.यावर्षी ३१ जुलै रोजी नुहानमध्ये ब्रजमंडल यात्रेत सहभागी झालेल्या हिंदू भाविकांवर देखील हल्ला झाला होता. आता तब्बल चार महिन्यांनंतर पुन्हा अशीच घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८:२० च्या सुमारास कुआन पूजनासाठी जाणाऱ्या महिलांच्या गटावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये अनेक महिला जखमी झाल्या. नुहानचे एसपी नरेंद्र बिजारनिया यांनी सांगितले की, काही महिला संध्याकाळी विहिरीची पूजा करण्यासाठी जात होत्या. मदरशातील काही मुलांनी दगडफेक केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. यानंतर दोन्ही समाजातील लोक जमा झाले.
ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत केले आणि त्यांना आपापल्या घरी पाठवले. मदरशाचे मौलाना मुफ्ती मोहम्मद जाहिद यांना बोलावून माहिती घेण्यात आली. आरोपींवर तातडीने व योग्य ती कारवाई केली जाईल. आम्ही लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहोत.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नुहानच्या वॉर्ड क्रमांक १० मध्ये राहणारे राम अवतार यांना मुलगा झाला. प्रथेनुसार त्यांच्या कुटुंबातील महिला विहिरीची पूजा करण्यासाठी वाद्ये घेऊन जवळच्या शिवमंदिरात जात होत्या.या महिला मशिदीजवळून जात असताना मदरशातील २० हून अधिक मुलांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच हिंदू समाजाचे लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.