नवी दिल्ली : ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाचा दुरुपयोग ही समाजापुढील एक मोठी समस्या आहे. त्याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भाजपतर्फे पत्रकारांसाठी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या नव्या विस्तारित कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थित माध्यमकर्मींसोबत संवाद साधला. ते म्हणाले, सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाचा वापर होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, या ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाचा होणार गैरवापर ही समाजापुढील मोठी समस्या बनू पाहत आहे. ‘डीप फेक’द्वारे तयार करण्यात आलेली छायाचित्रे, चित्रफीती यांची शहनिशा करण्याची व्यवस्था समाजातील मोठ्या वर्गाकडे नाही. समाजात असंतोष आणि द्वेषाची आग मोठ्या प्रमाणात पसरविण्याची क्षमता ‘डीप फेक’मध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये या विषयावर समाजाला जागरूक करण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करण्याची गरज आहे. भारतीय समाजामध्ये प्रसारमाध्यमांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून या विषयाकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
‘व्होकल फॉर लोकल’ हे आवाहन आता लोकचळवळ बनत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या एका आठवड्यात साडेचार लाख कोटींहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. देशासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. याद्वारे लहानातला लहान व्यावसायिक माणूस यातून पैसा कमावतो. या ताकदीच्या जोरावर आपण 'विकसित भारत'चा संकल्प यशस्वीपणे पुढे नेऊ शकतो. 'विकसित भारत' ही आता केवळ कल्पना राहिली नसून ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिक आता सज्ज झाला आहे. करोना संकटाचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या भारताची क्षमता आता सिद्ध झाली असून संपूर्ण जग आता भारताच्या यशाकडे पाहत आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
माझाच गरबा खेळतानाचा व्हिडीओ बघितला
‘डीप फेक’ तंत्रज्ञानाचा वापर करून मी गरबा खेळत असल्याचा समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहण्यात आला. खरे तर शालेय जीवनात मी उत्तम गरबा खेळत असे, मात्र त्यानंतर कधीही गरबा खेळलेलो नाही. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर करून काहीही शक्य असल्याचे पंतप्रधानांनी स्वत:चेच उदाहरण देऊन स्पष्ट केले.
पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी
गेल्या काही काळात काही अगदी तरुण पत्रकारांनी आपले प्राण गमाविल्याच्या घटना मला समजल्या आहेत. राजकीय नेत्यांप्रमाणेच पत्रकारांचेही जीवन अत्यंत धकाधकीचे असते, त्यामुळे चाळीशीनंतर प्रत्येकाने वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार आणि प्रसारमाध्यम समुह यांनी एक यंत्रणा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आणि क्लिक झाले मनसोक्त सेल्फी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांशी अगदी मनमोकळा संवाद साधला. आपल्या संबोधनानंतर पंतप्रधानांनी जवळपास १५ ते २० मिनिटे पत्रकारांजवळ जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी पंतप्रधानांसोबत सेल्फी काढण्याची संधी सोडली नाही.