मुंबई : एकदिवसीय विश्वचषकमध्ये अंतिम फेरीत भारताने आपले स्थान निश्चित केले आहे. न्यूझीलंडसोबत झालेल्या उपांत्य फेरीत ७० धावांनी भारताने न्यूझीलंडवर मात करून थेट अंतिम सामन्यात धडक मारली. यावेळी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विराट कोहलीने वनडेमधील ५०वं शतक मारत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम देखील मोडला. यानंतर सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत असताना अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
कंगनाने कोहलीच्या 'विराट' विक्रमाबाबत पोस्ट करत त्याचे कौतुक केले आहे. कोहलीने ५०वे शतक मारल्यानंतर सचिनने उभे राहून त्याचे अभिनंदन केले होते. तर कोहलीने हेल्मेट काढून सचिनचे मैदानातूनच नतमस्क होत आभार मानले होते. मुजरा केला. कंगनाने इन्स्टाग्रामवरुन कोहलीचा हा स्टेडियममधील व्हिडिओ शेअर केला करत लिहिले आहे की, "किती अद्भुत!! त्याचा रेकॉर्ड मोडणाऱ्यांकडून त्याला कशाप्रकारे मानवंदना मिळावी हा आदर्श विराट कोहलीने आज घालून दिला आहे. त्याची पावलं जिथे पडली त्या जागेची पूजा करायला हवी. तो यासाठी पात्र आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व महान आहे," अशी पोस्ट कंगनाने केली आहे.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ५ वेळा विश्वचषक आपल्या नावावर करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सामना भारत कसा करणार आणि हा सामना कसा रंगणार याकडे क्रिकेटजगतातील सर्वांचे लक्ष लागले आहे. १९ नोव्हेंबरला होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.