समुपदेशनातून समाजकार्य!

17 Nov 2023 21:18:54
Articel on Sanjay Kulkarni

व्यावसायिक ते यशस्वी करिअर समुपदेशक ते कुटुंब प्रबोधनाने समाज जागृती करणारे समाजचिंतक, असे बहुआयामी कार्य करणारे पुण्याचे संजय कुलकर्णी. त्यांच्या जीवनाचा घेतलेला हा मागोवा...

संजय कुलकर्णी हे पुण्यातील यशस्वी करिअर समुपदेशक. ते कुटुंब प्रबोधनासाठी काम करतात. पुण्यात काही महिन्यांत ६००च्यावर ’लव्ह जिहाद’विरोधी जागृती सभा झाल्या, त्यामध्ये संजय यांची महत्त्वाची भूमिका होती. विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर पालकांनाही जागृतीची गरज आहे, हा विचार करून पालकांसाठीही संजय या विषयातली जागृतीपर सभा घेत असतात. त्यांचे ’माई’ नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. कोरोना काळातही पुण्यात ‘कोरोना संवादक’ म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जवळ-जवळ ४०० लोकांना ‘कोरोना’ काळातील समुपदेशक म्हणून प्रशिक्षित केले होते. संजय उत्तम समुपदेशक, लेखक आणि विचारवंत म्हणून पुण्यात संजय यांचा लौकिक आहे.

कुलकर्णी कुटुंब मूळचे सातार्‍याचे. पण, कामानिमित्त संजय यांचे पिता अनंत आणि आई विमल पुण्याला आले. अनंत आणि विमल दोघेही संघ संस्कारीत. त्यामुळे मुलांवरही संघाचेच राष्ट्रप्रेमी, समाजधर्मनिष्ठ संस्कार. संजय तर शिशु शाखेचे स्वयंसेवक. अंदमानच्या काळकोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या तुरुंगात होते, त्या खोलीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून अनंत कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हा ते अंदमानमध्ये ‘मुख्य सचिव’ म्हणून कार्यरत होते. हे सगळे घडताना संजय यांनी पाहिले होते. देश, देशाचे स्वातंत्र्य आणि देशप्रेम याबद्दलच्या संकल्पना संजय लहानपणापासूनच अनुभव होते.

कुलकर्णी कुटुंब अंदमानातच राहत असे. मात्र, एकदा विमल मुलांना घेऊन काही दिवसांसाठी पुण्याला आल्या आणि अनंत कामानिमित्त अंदमानला राहिले. नेमके तेव्हाच पानशेत धरण फुटले. धरण फुटल्यावर त्यांच्या घराच्या आसपासही पाणी चढू लागले. काही वेळाने पाणी ओसरेल म्हणून विमल मुलांना घेऊन नेसत्या वस्त्रानिशी त्यांच्या आईकडे गेल्या. पुराचा वेढा ओसरल्यावर त्या पुन्हा घरी आल्या; तर घर गायब. सगळीकडे चिखलाचे मैदान. कालपर्यंत दिमाखात उभे असलेले घर पुराने गिळून टाकले. होते नव्हते सगळे गेले. झालं ते झालं नव्याने सुरू करत, त्या कामाला लागल्या. आईचा खंबीरपणा संजय यांनी पाहिला आणि त्यांच्या आयुष्यात पुढे कोणत्याही प्रसंगात ते कधीही खचले नाहीत.

याच काळात अनंत यांनी अंदमानची नोकरी सोडली आणि ते पुण्याला आले. पुण्यातून कुलकर्णी कुटुंब पुढे सोलापूरला स्थायिक झाले. संजय यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण सोलापुरातच झाले. १९७५ साल होते, आणीबाणी लागली. ‘मिसा’मध्ये अनंत तुरुंगात गेले आणि संजयसुद्धा ‘मिसा’मध्ये १५ महिने तुरुंगातच होते. त्यावेळी संजय ’बीकॉम’च्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी होते. शेवटी ‘पॅरोल’वर सुटून दोन महिने अभ्यास करून ते ‘बीकॉम’ उत्तीर्ण झाले.
 
संजय यांना १९७६ साली ’एअर इंडिया’मध्ये नोकरी लागली. त्याचकाळात ते संघाच्या माध्यामातून हिंदू स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षणामध्ये शिक्षक म्हणून जाऊ लागले. काम करत असताना तत्कालीन मा. सरसंघचालक रज्जूभैय्यांचे त्यांना निकटचे मार्गदर्शन लाभले. पुढे १९९६ साली नोकरी सोडून संजय यांनी सोलापुरात सोलापुरी चादरी बनवता निर्माण होणार्‍या घनकचर्‍याचे पुनर्वापर करून पुठ्ठा बनवायचा कारखाना सुरू केला. कारण, व्यावसायिक व्हावे, ही त्यांची लहाणपणापासूनची इच्छा. या व्यवसायाचा अभ्यास त्यांनी वर्षभर केला. नागपूरमधील एका कारखान्यात सहा महिने प्रशिक्षणही घेतले आणि त्यांनी ‘विमल बोर्ड इंडस्ट्रीज’ ही कंपनी सुरू केली. व्यवसाय उभा करून एक वर्ष झाले नाही, तर १९८७ सालचा शासनाचा ’सर्वोत्तम लघुउद्योग पुरस्कार’ त्यांना मिळाला. काही वर्षांनी संगणक आणि नवीन तंत्रज्ञान आल्यावर व्यवसाय मंदावत गेला. तेव्हा त्यांच्या पत्नी विद्या यांनी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या मुलांसाठी ’श्री विद्या कोचिंग अ‍ॅकेडमी’ ही खासगी शिकवणी सुरू केली. विद्या या अभाविपच्या कार्यकर्त्या. त्यामुळे शिक्षण आणि विद्यार्थ्यांशी सूर लगेच जुळले.

अ‍ॅकेडमीमध्ये शेकडो विद्यार्थी शिकायला येऊ लागले. मग संजय यांनी ’श्री विद्या अ‍ॅकेडमी’चे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी घेतली. फावल्या वेळात ते उच्चशिक्षणासंदर्भातले सरकारी नियम, महाराष्ट्रातील अनुदानित-विनाअनुदानित महाविद्यालय, त्यांची प्रवेश नियमावली तिथले आरक्षण याबाबत अभ्यास करू लागले. बघता-बघता शैक्षणिक करिअर मार्गदर्शक म्हणून सोलापुरात संजय यांचे नाव झाले. याच काळात संजय यांची दोन्ही मुले शिक्षणासाठी पुण्यात आली. तेव्हा विद्या म्हणाल्या की, ”आपण इथे सोलापुरात कितीही पैसे कमवत असू, तरी मुलं तिथे पुण्यात आहेत. आपण पुण्याला जाऊ.” शेवटी २००६ साली सोलापुरातील शिकवणी वर्ग बंद करून संजय आणि विद्या पुण्यात आले. मुलांसोबत राहू लागले. संजय यांनी पुण्यातही उत्तम समुपदेशक, करिअर मार्गदर्शक म्हणून नावलौकिक मिळवला. तसेच स्वतःसोबत समाज आणि देशाचे नावही उज्ज्वल करावे, यासाठी संजय तरुणाईला यशस्वी समुपदेशन, सर्वतोपरी सहकार्य करतात. भविष्यात काय करायचे आहे, असे विचारल्यावर संजय म्हणतात की,
तन समर्पित मन समर्पित
और ये जिवन समर्पित
चाहता हू देश की धरती
तुझे कुछ और भी दू...

९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0