मुंबई : अभिनेता सुबोध भावे एक उत्तम आमि हरहुन्नरी कलाकार तर आहेच, शिवाय तो एक जबाबदार नागरिक देखील आहे. नुकताच त्याने महाराष्ट्र सरकारने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केलेल्या 'लेक लाडकी योजने'ची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेबद्दल माहिती दिली आहे.
काय म्हणाला सुबोध भावे?
“१ एप्रिल २०२३ पासून महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक खास योजना सुरु केली आहे. ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे तसेच, ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी आहे अशांसाठी ही 'लेक लाडकी २०२३' ही योजना आहे. मुलींचा मृत्यूदर कमी होऊन जन्मदर वाढवण्यासाठी , स्त्री सक्षमीकरणासाठी, बालविवाह प्रथेवर आळा घालण्यासाठी, आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे आपल्या मुलीच्या भविष्यासाठी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या”, असे आवाहन
सुबोध भावे याने व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.
राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरु करण्यात येणार आहे.
कुणाला मिळणार या योजनेचा लाभ?
'लेक लाडकी योजना २०२३' या योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ घेता येणार आहे.
तसेच, शासनामार्फ़त थेट लाभार्थी हस्तांतरणद्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार असून दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.