मुंबई : मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत ही ओरड गेली अनेक वर्ष ऐकली जात आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'नाळ भाग २' या चित्रपटालाही याचा सामना करावा लागला होता. चित्रपटाच्या पहिल्या भागाला अर्थात नाळ या चित्रपटाला २०१८ साली प्रदर्शनानंतर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, 'नाळ भाग २' च्या वाट्याला प्रेक्षकांनी गर्दी न केल्यामुळे हिरमोड झाला आहे. यावर आता अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपले मत मांडले आहे. आणि ज्याचे नशीब वाईट असेल त्याच्याच वाट्याला नाळ सारखे चांगले चित्रपट येत नाहीत, असे म्हणत मराठी निर्मात्यांनी उत्कृष्ट चित्रपट हिंदीत डब करुन देशभरात दाखवले पाहिजे अशी नम्र विनंती देखील यावेळी महेश मांजरेकर यांनी केली आहे.
काय म्हणाले महेश मांजरेकर?
“ ‘नाळ २’ चित्रपट पाहिला. तो चित्रपट पाहिल्यानंतर मला अभिमान वाटला की मराठी चित्रपट इतका चांगला होऊ शकतो. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की, फार लोकं मराठी चित्रपट पाहायला येत नाहीत. याचं कारण मला देखील समजलं नाही. म्हणजे तुम्हाला चांगला चित्रपट पाहायचा असेल तर भाषेचे बंधन त्याला नसते. आणि ज्याचे नशीब वाईट असेल त्याच्याच वाट्याला नाळ सारखे चांगले चित्रपट येत नाहीत. इराणचे सुप्रसिद्ध फिल्ममेकर माजीद माजीदी सारखे चित्रपट बनवत नाहीत अशी तक्रार केली जाते. पण माजीद माजीदी यांनी जर का ‘नाळ २’ पाहिला तर त्यांनाही चित्रपटांचा अभिमान वाटेल इतका उत्तम हा चित्रपट झाला आहे. कन्नड चित्रपट हिंदी भाषेत डब करुन इथे हिट होतात. ‘आरआरआर’ किंवा ‘पुष्पा’ सारखे चित्रपट देखील सुपरहिट होतात. पण माझं मराठी निर्मात्यांना एक प्रामाणिक आव्हान आहे की, आपले चांगले मराठी चित्रपट हिंदीत डब करा आणि देशभरात ते दाखवा. देशातील प्रेक्षकांनाही कळले पाहिजे की मराठी चित्रपट आशयांच्या बाबतीत किती श्रीमंत आहे”, असे महेश मांजरेकर म्हणाले.
'नाळ' चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये बालकलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. या चित्रपटातील प्रमुख बालकलाकाराची भूमिका सारालेल्या श्रीनिवास पोकळे याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. नाळ २ मधील चिमुकल्यांच्या अभिनयाचे कौतुक करताना महेश मांजरेकर म्हणाले की, “ ‘नाळ २’ मधील चिमीची व्यक्तिरेखा साकारलेल्या त्रिशा ठोसर हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार नाही तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे नामांकन द्या. कारण कलाकार हा वयाने लहान किंवा मोठा नसतो तर फक्त कलाकार असतो”. त्यामुळे भविष्यात तरी मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल वाढेल का? किंवा नेमकी परिस्थिती काय असेल हे येणारा काळच ठरवेल असे चित्र दिसून येत आहे.