नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहिरनामा गुरुवारी जाहिर केला आहे. त्यामध्ये गव्हाची २७०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, महिला सुरक्षेसाठी अँटी रोमिओ फोर्सच्या स्थापनेसह पाच वर्षाच अडिच लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी जाहिरनामा प्रकाशित केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, जाहिरनामा हा इतर पक्षांसाठी औपचारिकता आहे. पण, हा भाजपसाठी विकासाचा रोडमॅप आहे. आम्ही जे जे सांगितले ते तर केलेच मात्र, जे सांगितले नाही तेही केले आहे. त्याउलट राजस्थानमध्ये काँग्रेसने पाच वर्षांत केवळ खोटी आश्वासने दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
केंद्र सरकारने राज्यास भरघोस मदत केल्याचा दावा नड्डा यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, गेहलोत सरकारने भाजपच्या कामात अडथळा आणला. केंद्र सरकारने राज्याला २३ वैद्यकीय महाविद्यालये दिली. भाजपला दुहेरी इंजिनचे सरकार हवे आहे, तर येथे तुष्टीकरण आणि पेपरफुटीचे सरकार आहे. भाजपचा जाहीरनामा विकास, सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांवर आधारित असून राजस्थानचा विकास करण्याची क्षमता केवळ भाजपमध्येच असल्याचेही नड्डा यांनी यावेळी सांगितले आहे.
जाहिरनाम्यातील प्रमुख आश्वासने
१) साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई, हेल्पलाइन क्रमांकासह खत वितरण नियामक कार्य दलाची स्थापना
२) पुढील 5 वर्षात शेतकर्यांना ०% व्याजदराने १ लाख कोटी रुपयांचे कर्ज देणार.
३) शेतीसाठी दररोज ८ तास अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करणार.
४) एमएसपीवर मोहरी, भुईमूग आणि सोयाबीन खरेदीची व्यवस्था करेल.
५) महिलांसाठीच्या सर्व प्रलंबित रिक्त जागा प्राधान्याने भरल्या जातील आणि शिक्षक भरतीमध्ये महिलांचे आरक्षण 50 टक्के करण्यात येईल.
६) गरीब आणि वृद्ध नागरिकांना दरवर्षी ४ मोफत वैद्यकीय तपासणीची संधी.
७) गरजू तरुणांसाठी जेईई, नीट, क्लॅट, युपीएससी, आरपीएससी सारख्या परीक्षांसाठी मोफत कोचिंगची व्यवस्था.
८) जोधपूरमध्ये अन्न तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापन करणार.
९) प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस युनिट स्थापन केले जातील.
१०) सर्व जिल्हा रुग्णालयात २० हजार नवीन खाटांची व्यवस्था करणार.