मुंबई : "आमची अमित शहाजींकडे पहिली मागणी अशी आहे, की तुम्ही देशाचे केंद्रीय मंत्री आहात, केवळ मध्यप्रदेश पुरते नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात जे रामलल्लाचे भक्त आहेत, त्यांना त्यांच्या सोयीनुसार मोफत अयोध्यावारी करावी. फक्त २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनावेळीच नाही, तर जेव्हा लोकांना वाटेल, तेव्हा ते दर्शन मोफत घडवून दिलं गेलं पाहिजे." अशी मागणी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "देशात काही राज्यांमध्ये निवडणुका चालू आहेत. क्रिकेटमध्ये काही नियम असतात तशीच निवडणुकीत आचारसंहिता असते. शिवसेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. काही शंकांवर खुलासा होण्यासाठी. निवडणूक आयोगाचं धोरण अनेकदा असं दिसतंय की भाजपा फक्त सत्तेवर असल्यामुळे त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काही केलं तर आमची हिट विकेट काढायची. याला मुक्त वातावरणातल्या निवडणुका म्हणता येणार नाही. १९८७ साली पार्ल्यात पोटनिवडणूक झाली होती. आमच्याकडून रमेश प्रभू जिंकले होते. भाजपा आमच्या विरोधात होती. ही पहिली निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढलीच नाही तर जिंकली गेली. तेव्हा शिवसेनाप्रमुखांचाही मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी काढून घेण्यात आला. कारण हिंदुत्वाचा प्रचार केला. आज मात्र आम्हाला वाटतंय की निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केले असावेत. ते केले असतील तर सगळ्यांना ते सारखेच असायला पाहिजेत. ते सगळ्यांना कळले पाहिजेत.” असं ठाकरे म्हणाले.
“निवडणूक आयोगाने यासंदर्भात खुलासा करावा. जर पंतप्रधान मतदान करताना बजरंग बली की जय म्हणण्याचं आवाहन करतायत, तर मग आम्हीही येत्या निवडणुकीत जनतेला आवाहन करतो की जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया म्हणून मतदान करावं. ज्या कारणामुळे बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता, तो योग्य होता की आत्ता पंतप्रधान, गृहमंत्री करतायत ते योग्य आहे? आचारसंहितेत बदल केला असेल, तर ते आयोगानं स्पष्ट करावं. आम्ही यासाठी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.