"काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंनाही रामनामाची ॲलर्जी" - चंद्रशेखर बावनकुळे
16-Nov-2023
Total Views |
मुंबई : काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंनाही रामनामाची ॲलर्जी झाली आहे. त्यामुळेच रामनामाचा गजर केला की त्यांना त्रास होतो, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना गुरुवारी ट्विटरद्वारे दिले. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. 'काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. निवडणुकीसाठी आचारसंहिता असते. काही शंकाकुशंकाबाबत खुलासा व्हावा, यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
कर्नाटकात पंतप्रधान मोदी यांनी 'बजरंग बली की जय' म्हणत मतदान करा, असे आवाहन जनतेला केले होते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीत, रामलल्लाचे दर्शन फुकट देऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे केवळ भाजपची सत्ता आहे म्हणून त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काही केले की आमची विकेट काढायची, याला मोकळ्या वातावरणातल्या निवडणुका म्हणू शकत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
त्या टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये बावनकुळे लिहितात, काँग्रेसने प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते. आता तुम्ही रामनाम आणि रामभक्तांचा तिरस्कार करत आहात. तुम्ही कितीही विरोध केला तरी करोडो रामभक्त आयोध्येत जाऊन रामलल्लांचे दर्शन घेतीलच.
रामनामाचा आणि रामभक्तांचा भाजपला अभिमान आहे. तुम्हाला मात्र रामनामाचा गजर केला की त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे काँग्रेसप्रमाणे तुम्हालाही आता रामनामाची ॲलर्जी झाली आहे, असा टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.