मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देशात सुरू असलेल्या वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका, आगामी लोकसभा निवडणूक आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न विचारण्यात आले. निवडणूक काळात पक्ष मतदारांना वेगवेगळी अमिषं दाखवत आहेत. परंतु, निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षांवर आक्षेप घेतोय असं बोललं जात आहे. त्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं उदाहरण दिलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, "विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे. तर आज उपांत्य फेरीतला दुसरा सामना सुरू होणार आहे. त्या दोन संघांपैकी जिंकेल तो संघ अंतिम सामन्यात भारताविरोधात खेळेल. मला वाटतंय, बहुदा त्यांच्यापैकी जिंकेल त्या संघाला सांगतील, साहबने बोला हैं हारने को, असंही सांगितलं जाऊ शकतं." भारताने यंदाचा विश्वचषक जिंकणं हा आगामी निवडणूक जिंकण्याच्या रणनीतिचा भाग असू शकतो का? त्यावर राज ठाकरे म्हणाले, "नाही, लोकसभेच्या निवडणुका अद्याप खूप लांब आहेत. जनता चांद्रयानच्या बातम्या विसरली. लोकसभा निवडणुकीपर्यंत लोक विश्वचषक स्पर्धा विसरतील. रोज इतक्या बातम्या आपण पाहतो, आपल्या मोबाईलवर इतक्या बातम्या दिसतात की लोकांना हे सगळं लक्षात ठेवायला वेळ नाही." असं राज ठाकरे म्हणाले.