मुंबई :भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक सामन्यात भारताने बुधवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान मिळवले आहे. ७० धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवत भारताने सर्वांचीच दिवाळी अधिक आनंदित केली आहे. त्यात भर म्हणून क्रिकेटपटू विराट कोहली यांनी मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा देखील विक्रम मोडित काढून ५० वे वनडे शतक झळकावून प्रत्येक भारतीयाची मान उंचावली आहे. विराटच्या या अविस्मरणीय यशानंतर पत्नी अनुष्का शर्मा हिने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहित ‘तु देवाचाच मुलगा आहेस’ असा विराटचा उल्लेख करत त्याचे कौतुक केले आहे.
अनुष्का म्हणते, “देव खरोखरंच एक उत्तम कथा लेखक आहे. मी त्याची आभारी आहे कारण मला त्याने तुझे प्रेम मिळवून दिले. तू दिवसेंदिवस अधिक सामर्थ्यवान बनत आहेस. तुला हवे ते सर्व साध्य करताना पाहणे हे खरोखरं खूप सुंदर आहे. तू नेहमी स्वत:शी आणि खेळाशी प्रामाणिक असतोस. खरंच तू देवाचे मुलं आहेस.'
दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेला हा रंजक सामना पाहण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रणबीर कपूर, जॉन अब्राहम, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, सोहा अली खान, कुणाल खेमु यांनी हजेरी लावली होती. आता संपुर्ण भारताचे लक्ष १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागले आहे.