‘आसियान’ आणि म्यानमार

16 Nov 2023 20:52:06
ASEAN defence meet
 
‘आसियान’ या दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या संघटनेतील देशांच्या संरक्षणमंत्र्यांची दोन दिवसीय परिषद नुकतीच इंडोनेशियामधील जकार्ता येथे संपन्न झाली. या बैठकीला रशिया, ऑस्ट्रेलिया यांसारख्या इतरही देशांचे सदस्य निमंत्रित होते. भारतातर्फे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या परिषदेला हजेरी लावली आणि पुन्हा एकदा हे युद्धाचे युग नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या परिषदेत मुख्यत्वे दक्षिण आशियाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणे, त्यावर कायमस्वरुपी उपाय शोधणे अपेक्षित. तशी चर्चा या बैठकीतही झालीच. परंतु, ‘आसियान’ परिषदेच्या केंद्रस्थानी मुद्दा राहिला तो इस्रायल-हमास संघर्षाचा. त्यामुळे ‘आसियान’मधील मुख्यत्वे मुस्लीमबहुल देश असलेल्या इंडोनेशिया, मलेशिया यांना जवळच्या म्यानमारपेक्षा ‘हमास’चाच पुळका जास्त असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

‘आसियान’ देशांची संघटना ही मुख्यत्वे दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या सर्वांगीण हितासाठी कार्यरत देशांचा समूह. सध्या ‘आसियान’मध्ये ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या दहा देशांचा समावेश होतो. भारत, चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, द. कोरिया हे ‘आसियान प्लस सिक्स’ या राष्ट्र समूहाचा भाग आहेत. त्यामुळे ‘आसियान’मध्ये या सर्व देशांचे तसेच अमेरिका, रशिया यांचेही निमंत्रित प्रतिनिधी उपस्थितीत असतात. ‘आसियान’ देशांशी भारताचा व्यापार एकूण दहा टक्के, तर चीनशी १८ टक्के आहे. त्यामुळे भारत आणि चीन हे दोन्ही देश ‘आसियान’साठी तितकीच महत्त्वाचे. मागील काही वर्षांत चीनच्या दक्षिण चिनी समुद्रातील अरेरावीमुळे मात्र इंडोनेशिया, फिलीपाईन्स हे देश भारताच्या व्यापारी आणि संरक्षण सामग्री खरेदीच्या निमित्ताने अधिक जवळ आलेले दिसतात. पण, हाच ‘आसियान’ समूह द. चीन समुद्रातील चिनी घुसखोरीला प्रतिबंधित करण्यात पुरता अपयशी ठरला आहे.

एवढेच नाही, तर इंडोनेशिया, फिलीपाईन्स यांसारख्या देशांनाही चीनला वारंवार इशारा देण्यापलीकडे आणि आपली संरक्षण सिद्धतता वाढविण्यापलीकडे याबाबत कायमस्वरुपी असा तोडगा काढता आलेला नाही, हे वास्तवच. यंदाच्या ‘आसियान’मध्येही समुद्रातील आंतरराष्ट्रीय सीमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांसह इतर देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी केले खरे. पण, गेंड्याच्या कातडीच्या चीनवर त्याचा काहीही परिणाम होईल, ही शक्यता शून्यच!दुसरीकडे इंडोनेशिया, मलेशिया यांसारख्या मुस्लीमबहुल देशांनी ‘आसियान’च्या व्यासपीठावरून इस्रायलला युद्धबंदीचे आवाहन करत, गाझा पट्टीतील विध्वंस थांबावा, अशी भूमिका मांडली. आता अर्थोअर्थी ‘आसियान’चा आणि इस्रायलचा संबंध नसला तरी ‘उम्मा’ची एक औपचारिकता म्हणून सातासमुद्र दूर असले तरी इंडोनेशिया, मलेशियाला इस्रायलचा विरोध करणे हे ओघाने आलेच. पण, याच समूहातील सदस्य देश असलेल्या म्यानमारमधील संघर्षावर आजवर तोडगा काढण्यास हीच ‘आसियान’ संघटना मात्र अयशस्वी ठरली आहे.

यंदाही म्यानमारमधील कोणताही प्रतिनिधी या परिषदेसाठी उपस्थित नव्हता. कारण, यापूर्वीही ‘आसियान’ने जारी केलेला पाचकलमी शांतता कार्यक्रम म्यानमारने पालन करण्यास दर्शविलेली असमर्थता. तसेच इंडोनेशियाने तर स्पष्टच शब्दांत म्यानमारमधील अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणार नसल्याचे सांगत आधीच हात वर केले आहेत. त्यामुळे म्यानमारमधील आंग सान स्यू की यांचा लोकशाही गट आणि तेथील ‘जुंटा’ या सैन्यशासित व्यवस्थेमध्ये मध्यस्थीची, चर्चेची ‘आसियान’कडून अपेक्षा करणे मुळी गैर ठरावे. पण, म्यानमारमधील समस्या ही केवळ त्या देशांच्या सीमांपुरती मर्यादित नाही. या देशातील रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशबरोबरच इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड यांसारख्या देशांतही घुसखोरी केली असून तिथेही ते निर्वासितांचे जीणे जगत आहेत. बांगलादेशप्रमाणेच इंडोनेशिया आणि मलेशिया या मुस्लीमबहुल देशांचीही रोहिंग्यांना सामावून घेण्याची तयारी नाहीच. म्हणजे जी गत अरब राष्ट्रांची, तीच गत या दक्षिण आशियातील मुस्लीम राष्ट्रांची. म्हणूनच म्यानमारमधील समस्येवर तोडगा काढणे हे केवळ भारत-बांगलादेशच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण पूर्व आशियामधील स्थैर्यासाठी महत्त्वाचे. पण, ऐकतोय कोण म्हणा?
 
Powered By Sangraha 9.0