मजुरांना बाहेर काढण्यासाठी आणले २५ टन वजनाचे अमेरिकन मशीन! बचावकार्यात वेग

16 Nov 2023 15:43:02

Uttarkashi


देहरादून :
उत्तरकाशीमध्ये सिलक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्याने गेल्या पाच दिवसांपासून ४० कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू, अद्याप त्यात यश आले नाही. त्यामुळे आता अमेरिकेतून विशेष ऑगर मशीन मागवण्यात आली आहे.
 
ऑगर ही २५ टन वजनाची एक ड्रिलिंग मशीन आहे. सुरुवातीला ही मशीन भारतीय वायुसेनेच्या तीन विमानांनी दिल्लीहून एअरलिफ्ट करण्यात आली असून चिन्यालिसौर विमानतळावर उतरवण्यात आले. त्यानंतर या मशीनला घटनास्थळी आणण्यात आले.
 
या मशीनमध्ये दर तासाला ५ टन ढिगारा काढण्याची क्षमता आहे. त्यामुळे याद्वारे लवकरात लवकर खोदकाम करुन कामगारांना बाहेर काढणे शक्य होणार आहे. या मशीनद्वारे बोगद्याच्या कोसळलेल्या भागाचा ढिगारा काढण्यात येत आहे. तसेच या कामासाठी काही विदेशी तज्ञांचीही मदत घेतली जात आहे.
 
दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ४० कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तेव्हापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित असून त्यांच्याशी सतत संपर्क सुरु आहे.



Powered By Sangraha 9.0