मुंबई : मिथिला पालकर ही कप सॉंग मुळे खरं तर प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने तिचे अभिनय कौशल्य मराठी चित्रपट, हिंदी वेब मालिकेत दाखवलेच. मात्र, चित्रपटांपेक्षा मिथीला वेब मालिकेत जास्त रमली. पण मुरांबा या मराठी चित्रपटात तिने उत्तम भूमिका साकारत मराठी प्रक्षकांनाही आपलेसे केले. परंतु, मुरांबा या चित्रपटानंतर पुन्हा ती मराठीत झळकलीच नाही. त्यामुळे मिथिला मराठीत काम का करत नाही? असे अनेक प्रश्न तिला विचारले जाऊ लागले. यावर नुकत्यात एका मुलाखतीत तिने मराठीमध्ये काम न करण्यामागचे कारण सांगितले आहे.
मिथिला म्हणाली, "मुरांबा हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या सिनेमानंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण, मला काही विषय पटले नाहीत. तर,काही रुचले नाहीत. काही सिनेमा, हाती अन्य प्रोजेक्ट्स असल्यामुळे करता आले नाहीत", असे थेट उत्तर तिने दिले. पुढे ती असे देखील म्हणाली की, "मला जेव्हा एखादी भूमिका पटते तेव्हाच मी ती करते. त्यात प्रेक्षकांचीही साथ मिळते. ते मला सांभाळूनही घेतात. समोरच्याला आनंद होईल की नाही किंवा कोणाचं मन सांभाळायचं म्हणून भूमिका स्वीकारत नाही. जेव्हा मला ते पात्र पटते, तेव्हाच मी त्या चित्रपटात काम करण्यासाठी होकार देते."
दरम्यान, मिथिला पालकरने आपल्या अभिनयाची सुरुवात २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘माझं हनिमून’ या एका शॉर्ट फिल्मपासून केली होती. ही फिल्म १६ व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये देखील दाखवण्यात आली होती. त्यानंतर सुरु झालेला प्रवास हा मराठी, हिंदी चित्रपट आणि वेब मालिकांपर्यंत घेऊन आला.