अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकार देणार मोफत साडी

15 Nov 2023 16:09:27
 
ration shop


मुंबई :
दिवाळीचे औचित्य साधून महायुती सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी विशेष योजना जाहीर केली आहे. 'कॅप्टिव्ह मार्केट' असे या योजनेचे नाव असून, त्याअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरवर्षी मोफत साडी वितरित केली जाणार आहे. वस्त्रोद्योग विभागामार्फत ही योजना राबविली जाणार आहे.
 
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्य सरकारने २०२३ ते २०२८ या पाच वर्षांकरिता एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही साडी यंत्रमागावर विणलेली असेल. राज्यातील जवळपास २४ लाख ५८ हजार ७४७ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ होईल, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
राज्यभरातील सर्व रेशन दुकानांमधून या साड्यांचे वितरण केले जाईल. त्यासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी ई-निविदेद्वारे केलेल्या दरकरारानुसार प्रति साडीची किंमत ३५५ रुपये (+ ५ टक्के जीएसटी) इतकी निश्चिच करण्यात आली आहे. या खर्चाचा सर्व भार राज्य सरकार उचलणार आहे.


बोधचिन्ह
 
वस्त्रोद्योग विभागाचे बोधचिन्ह
 
राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने 'वीण समृद्धीची' हे आपले नवे बोधवाक्य निश्चित केले आहे. शिवाय, मयुर विराजमान असलेले नवे बोधचिन्ह वापरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध योजनांची प्रचार-प्रसिद्धी करून विभागाचे कार्य आणि भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी शासन आदेशात नमूद केले आहे.


Powered By Sangraha 9.0