काश्मीरचे रुपांतर गाझात न होण्याचे श्रेय मोदींचेच; शेहला रशिदचे सूर बदलेलेच

15 Nov 2023 19:16:32
Shehla Rashid on Kashmir

नवी दिल्ली :
जम्मू – काश्मीरचे रुपांतर गाझात न होण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेच आहे, असे प्रतिपादन एकेकाळी ‘तुकडे तुकडे गँग’ची वकीली करणाऱ्या शेहला रशिद हिने केले आहे.

एशियन न्युज इंटरनॅशनल (एएनआय) या वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीमध्ये शेहला रशिद हिचे सूर अद्यापही बदलेलेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलाखतीमध्ये शेहला हिने आपल्या जुन्या ‘तुकडे तुकडे गँग’च्या भूमिकेचा त्याग केल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे जम्मू – काश्मीरसह अन्य अनेक विषयांवरही आता समतोल भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जम्मू – काश्मीरमध्ये सध्या अतिशय शांततेचे वातावरण आहे. जम्मू – काश्मीरमध्ये गाझासारखी परिस्थिती अजिबातच नाही आणि भविष्यातही तसे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाही. कारण, काश्मीरमध्ये आता तुरळक निषेध मोर्चे निघत असून घुसखोरीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे जम्मू – काश्मीर आता विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. असे वातावरण निर्माण होण्यासाठी काश्मीरी लोकांना दिलासा देण्यासाठी समर्थ नेतृत्वाची गरज होती. काश्मीरची ही गरज सध्याचे केंद्र सरकार आणि प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचेच आहे, असे शेहला हिने मुलाखतीत म्हटले आहे.
 
यापूर्वीदेखील शेहला रशिद हिने आपली जुनी भूमिका सोडून कलम ३७० हटविण्याचे समर्थन करून देशातील कथित पुरोगामी इकोसिस्टीमसला धक्का दिला होता. एकेकाळी जम्मू – काश्मीरमधील दगडफेकीसह घुसखोरीचेही समर्थन करणाऱ्या शेहला रशिद हिने आपली भूमिका आता ३६० अंशात बदलली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Powered By Sangraha 9.0