नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हायव्होल्टेज मॅच वानखेडेवर खेळविण्यात येत आहे. विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना आज खेळविण्यात येत असून या सामन्यापूर्वीच एका अज्ञात व्यक्तीने स्टेडियमवर हल्ला करण्याची धमकी दिली. दरम्यान, या धमकीनंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून त्यांनी स्टेडियमच्या आत आणि बाहेर पाळत ठेवली आहे. तसेच, या धमकीनंतर होणारा संभाव्य धोका लक्षात घेता अनेक अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सांगितले की, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 'नापाक' घटना घडवण्यात येईल, असा धमकीचा संदेश देण्यात आला होता. धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीसोबत अज्ञात व्यक्तीने छायाचित्रही पाठवले होते. या फोटोमध्ये बंदुका, ग्रेनेड आणि गोळ्या दाखवण्यात आल्या आहेत. यासोबतच त्याने मुंबई पोलिसांनाही टॅग केले होते.
तसेच, या धमकीनंतर पोलिस प्रशासन हायअलर्टवर असून या सामन्याकरिता ७ पोलिस उपायुक्त, २०० अधिकारी आणि ७०० पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. स्टेडियमच्या सर्व गेट्ससमोर पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय स्टेडियममध्ये पेन, पेन्सिल, मार्कर, कागद, बॅनर, पोस्टर्स, बॅग, नाणी, पॉवर बँक आणि ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे. आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जाईल.