नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर त्यांचा एक्स बॉयफ्रेंड जय अनंत देहाडराय यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. महुआ मोईत्रांनी संसदेत विचारलेले प्रश्न हे दुबईत तयार केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच दिल्ली कॅनिंग लेनमध्ये पंतप्रधान मोदींना शिव्या देणारी भाषणे लिहिली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जय अनंत देहाडराय यांनी 'X' वर पोस्ट करत हे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, "संसदेत विचारलेले प्रश्न दुबईमध्ये तयार केले गेले. कॅनिंग लेनमध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात भाषणे तयार करण्यात आली होती. त्यांचा स्मृतीभ्रंशाचा आजार संपेल तेव्हा फर्निचर आणि रोलेक्स व्यतिरिक्त २ कोटी रुपये मिळतील,” असेही ते म्हणाले आहेत.
देहाडराय यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले की, "महुआने आपल्या घरी पोलिस पाठवत दोन खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी दिली. तसेच हेन्री नावाचा कुत्रा तिच्याकडे सोपवून त्याच्या मालकीसंबंधीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला गेला," असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, खासदार महुआ मोइत्रांवर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हे आरोप केले आहेत. संसदेच्या आचार समितीने या आरोपांची चौकशी केली असून आपल्या अहवालात महुआ मोइत्रांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली आहे.