मोदींचा विरोध करता-करता विरोधक राष्ट्राचा द्वेष करू लागले : आचार्य प्रमोद क्रिष्णम
15-Nov-2023
Total Views |
नवी दिल्ली : "आपण आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाची समीक्षा करू शकतो, ही आपला देशातील लोकशाहीची सुंदरता आहे. मात्र, मोदींना विरोध करताकरता आता विरोधक त्यांचा द्वेष करू लागलेत. असे करताना या लोकांच्या हे लक्षात आलं नाही की, आपण मोदींचा नव्हे तर संपूर्ण देशाचा द्वेष करू लागलो आहोत. विरोधकांचे काम हे आहे की भाजपला सत्तेतून बाहेर केलं पाहिजे. मात्र, त्यांनी मोदींचा द्वेष इतका मनात भिनवला आहे की ते आता देशाचा विरोध करू लागले आहेत.", असा घरचा आहेर काँग्रेस नेते आचार्य प्रमोद क्रिष्णम यांनी केला आहे.
"मोदी जर नव्या संसदेचे निर्माण करतात तर त्यांचा विरोध करणं, मोदींनी संसदेत धर्मदंड (शंगोल) स्थापित केल्यानंतर त्याचा विरोध, मोदींनी वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले तर त्याचा विरोध, नमो भारत ट्रेनचं नाव ठेवलं तर त्याचा विरोध, तुम्ही लोकशाहीत आहात तुम्हाला विरोध करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधातही विरोधकांची देशाच्या भूमिकेविरोधात प्रतिक्रीया असते ही गोष्ट चुकीची आहे. ज्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचा निर्णय घेतला होता त्याकाळात इंदिरा गांधींच्या पाठिशी अटल बिहारी वाजपेयीजी ठामपणे उभे होते. ही असते विरोधी पक्षाची भूमिका", असे म्हणत आचार्य यांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे. सध्या सुरू असलेल्या इस्त्रायल-हमास युद्धाच्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
सध्या निवडणूकांचा हंगाम सुरू आहे मात्र, आचार्य क्रिष्णम यांना प्रचारापासून दूर ठेवण्यात आलं आहे. याबद्दल त्यांना विचारलं असता काँग्रेसला कदाचित हिंदूंचा पांठींबा नको आहे, असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "जो रामाचा विरोध करतो तो हिंदू असूच शकत नाही. हिंदू या शब्दाशी त्यांना द्वेष आहे. कुणी मंदिरात गेलं म्हणून हिंदू होऊ शकत नाही, कुणी चर्चमध्ये गेलं म्हणून ख्रिश्चन होऊ शकत नाही तसचं रामाला विरोध करणारे कधी हिंदू होऊ शकत नाही. राम मंदिराला विरोध करणारे नेमकं कोण होतं? त्यांच्या या भूमिकेमुळे लाखो हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचली आहे हे कुणी विसरू शकत नाही.", असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या चुकांवर प्रकाश टाकला.
"राजकारणातील भाषा ही सांकेतिक भाषा आहे. मी कुणाच्या वैयक्तिक गोष्टीबद्दल बोलणार नाही मात्र, मी ज्या प्रकारे या गोष्टी जाणवत आहे त्यावरुन लक्षात येतं की, काही लोकं हिंदूद्वेष करतात. काँग्रेस पक्षातील काही लोकांना हिंदू नकोच आहेत का? भारताच्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा प्रश्न आहे. रामाशिवाय आणि सनातन धर्माच्या शिवाय भारताच्या लोकशाहीची कल्पना केली जाऊ शकत नाही. भारत आणि सनातन वेगळे नाही. हा काही लोकांनी रचलेला डाव आहे की भारत आणि सनातन धर्माला विभन्न ठेवण्याचा प्रयत्न केला गेला.", अशी टीकाही त्यांनी केला आहे.
रामलला स्थानपन्न होणार!
हजारो वर्षांनंतर रामलला राम मंदिरात विराजमान होणार आहेत. भगवान श्रीरामाच्या मंदिराचं स्वप्न साकार होणार हा विचार घेऊन कित्येकांनी आपले प्राण सोडले होते. आम्ही या देशात हा क्षण पहात आहोत याचा अर्थ आम्ही भाग्यवान आहोत. I.N.D.I.A. आघाडीची स्थापना मोदींना हटवण्यासाठीच झाली. मोदींना विरोध करता करता हे लोकं आता भारतालाच विरोध करू लागलेत, असेही ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.